साताऱ्यात दुमदुमला सत्य-प्रेम-एकत्वाचा दिव्य संदेश
News By : Muktagiri Web Team
सातारा : “ब्रह्मज्ञानाद्वारे निराकार परमात्म्याची ओळख करुन त्याच्या रंगात रंगून जावे आणि आपले जीवन उज्वल करावे” असे प्रेरक उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी मंगलवारी 14 मार्च रोजी सायंकाळी सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित एक दिवसीय निरंकारी संत समागमात उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले. या समागमामध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्या व्यतिरिक्त पुणे, सोलापूर, लातुर, उस्मानाबाद व आजुबाजुच्या जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने निरंकारी भाविक भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जनांनी भागत घेतला. सद्गुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांच्या दिव्य दर्शनाने भक्त आनंदविभोर होऊन गेले होते. सद्गुरु माताजींनी आपल्या संबोधनामध्ये सांगितले, की जोवर आपण परमात्म्याला जाणत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी केवळ अनुमान लावत असतो आणि परमात्मा हा अनुमान किंवा कल्पनेच्या पलीकडे आहे. परमात्म्याची परिभाषा पाहिली तर तो स्थल-कालाशी बांधील नाही. तो सर्वत्र सामावलेला आहे, सृष्टीच्या कणाकणात व्याप्त आहे. त्याच्या स्वरूपात कधीकाळी कोणताही बदल घडत नाही. ब्रह्मज्ञानी संतांच्या सान्निध्यात जाऊन या परमात्म्याला जाणले जाऊ शकते. जाणल्यानंतर त्याचे सदासर्वकाळ दर्शन होत राहते. सद्गुरु माताजीं पुढे म्हणाल्या, की ईश्वराचा बोध प्राप्त करुन जेव्हा आपण त्याला आपल्या हृदयामध्ये वसवतो तेव्हा ज्याप्रमाणे आपल्या हृदयाचे स्पंदन चालू असतानाच आपण सर्व कामे करत असतो तद्वत सर्व कार्ये पार पाडत असतानाच आपली भक्तीदेखील होत राहते. भक्त गृहस्थाश्रमात राहून आपल्या कर्तव्यांचे पालन करत असतो. समाजापासून दूर एकांतात स्थळी जाऊन भक्ती करत नाहीत. ते परमात्म्याशी प्रेम करत असल्याने सर्वांभूती त्याचेच रूप पाहत असतात त्यामुळे त्यांच्या मनामध्ये सदोदित समाजाच्या कल्याणाची भावना साठलेली असते. शेवटी, सद्गुरु माताजींनी हेच प्रतिपादन केले, की या दिव्य परमात्म्याशी नाते जोडल्याने दैवी गुण आपोआपच जीवनात प्रवेश करतात. जेव्हा कोणी परमात्म्याशी प्रेम करत असतो तेव्हा तो इतरांना त्यांच्या बाह्य रंग-रूपावरुन, भाषेवरुन किंवा आहार इत्यादितील विभिन्नतेवरुन वेगळा समजत नाही. प्रत्येकामध्ये परमात्म्याचे रूप पाहून सर्वांना श्रेष्ठच समजत असतो. भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्वांशी प्रेमाने वागू लागतो.