'कृष्णा'च्या साखरेचा गोडवा आता सातासमुद्रापार!
इंडोनेशियाला साखर रवाना; या हंगामात ५ लाख क्विंटल साखर निर्यातीचे उद्दिष्ट
Published:Jan 29, 2021 03:51 PM | Updated:Jan 29, 2021 03:51 PM
News By : Muktagiri Web Team
रॉ शुगरला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मागणी आणि केंद्र सरकारचे सकारात्मक निर्यात धोरण याचा विचार करून, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी २०२०-२१ या गळीत हंगामात रॉ शुगर उत्पादित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच या हंगामात ५ लाख क्विंटल कच्ची साखर तयार करून ती निर्यात करण्याचेही उद्दिष्ट ठरविले आहे. त्यानुसार कारखान्यात उत्पादित करण्यात आलेल्या साखरेचा पहिला ट्रक निर्यातीसाठी नुकताच पाठविण्यात आला
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सभासद हिताचे निर्णय राबवत सहकारात आदर्श निर्माण केला आहे. कृष्णा कारखान्याच्या साखरेची चव संपूर्ण देशभरातील लोकांना चाखायला मिळतेच, पण आता सातासमुद्रापार राहणाऱ्या परदेशातील लोकांनाही 'कृष्णा'च्या साखरेची चव चाखायला मिळणार आहे. कारण कृष्णा कारखान्याने उत्पादित केलेली साखर नुकतीच इंडोनेशियाला रवाना करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या केंद्र शासनाने कारखान्यांची आर्थिक तरलता सुधारावी, साखर कारखान्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून साखर निर्यात योजना जाहीर केली आहे. या योजनेस अनुसरून आणि मागील तसेच चालू हंगामातील शिल्लक साखर साठा विचारात घेऊन आणि सध्या पांढऱ्या साखरेला बाजारात कमी प्रमाणात असलेली मागणी, पर्यायाने मंदावलेला साखरेचा उठाव, बाजारात घसरलेले साखरेचे दर अशा अनेक बाबींचा विचार करून कारखान्यात रॉ शुगरची निर्मिती करण्याचे धोरण सर्वत्र अंगीकारण्यात आले आहे. या रॉ शुगरला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मागणी आणि केंद्र सरकारचे सकारात्मक निर्यात धोरण याचा विचार करून, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी २०२०-२१ या गळीत हंगामात रॉ शुगर उत्पादित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच या हंगामात ५ लाख क्विंटल कच्ची साखर तयार करून ती निर्यात करण्याचेही उद्दिष्ट ठरविले आहे. त्यानुसार कारखान्यात उत्पादित करण्यात आलेल्या साखरेचा पहिला ट्रक निर्यातीसाठी नुकताच पाठविण्यात आला. या ट्रकचे विधिवत पूजन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, की केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत कृष्णा कारखान्याने साखर निर्यातीचा हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, या निर्णयाचा लाभ कारखान्यास होणार आहे. याप्रसंगी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, संजय पाटील, गिरीश पाटील, सुजित मोरे, अमोल गुरव, ब्रिजराज मोहिते, दिलीपराव पाटील, पांडुरंग होनमाने, गुणवंतराव पाटील, निवास थोरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, रघुनाथ मोहिते, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, सेक्रेटरी मुकेश पवार, जनरल मॅनेजर (टेक्निकल) पी. डी. राक्षे आदींसह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.