दुचाकी चोरटा कराड डीबीच्या जाळ्यात
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 20 ः सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कराड शहर व परिसरातील दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सैदापूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 5 लाख 30 हजार रूपये किमतीच्या चोरलेल्या 8 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. विक्रम रमेश सकट (वय 27, रा. बेघर वस्ती सैदापूर, ता. कराड) असे ताब्यात घेतलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी कराड शहर व परिसरात होणाऱ्या दुचाकी चोऱ्याबाबत आढावा घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांना दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तात्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व त्यांच्या टीमला शनिवारी सैदापूर परिसरात गस्त करीत असताना विक्रम सकट हा संशयीतरित्या दुचाकीवर उभा असलेला दिसून आला. त्याच्या हालाचाली संशयास्पद वाटल्याने पतंग पाटील यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे ताब्यातील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. विक्रम सकट याला शहर पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता त्याने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून 8 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. सदरची कामगिरी डीवायएसपी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केली.