महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे ( २३ फेब्रुवारी ) तीनच्या सुमारास निधन झाले, ते ८६ वर्षाचे होते. गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ICUमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. सुरुवातीला माधूकरी, त्यानंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ची स्थापना, १९७६ ला मुंबईचे महापौर, मार्च १९९० ते डिसेंबर ९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर ९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिला आहे.