पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश जाधव, उपाध्यक्षपदी बाळासाहेब जाधव तर सचिवपदी मोहनराव जाधव यांची निवड करण्यात आली.
निढळ : पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश जाधव, उपाध्यक्षपदी बाळासाहेब जाधव तर सचिवपदी मोहनराव जाधव यांची निवड करण्यात आली.
मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त मंडळाची सभा रविवारी संपन्न झाली. डॉ. जाधव यांनी संस्थेच्या सचिवपदी गेल्या 25 वर्षात संस्थेस शैक्षणिक, क्रीडा तसेच समाजोपयोगी उपक्रमात आपल्या नेतृत्वगुणांनी जिल्ह्यात वैभव प्राप्त करून दिले. जांब, रणसिंगवाडी येथील हायस्कूल तसेच पुसेगाव येथील श्री हनुमानगिरी प्राथमिक शाळा, डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करून दर्जेदार शिक्षण देण्यास सुरुवात केली. श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव येथे गुरुकुल सेमी इंग्रजीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. जांब, जाखणगाव, पुसेगाव, राजापूर, रणसिंगवाडी येथील प्रशस्त शालेय इमारती व मैदाने डॉ. जाधव यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने उभ्या केल्या.
गुणवत्तेबरोबर संस्काराची जपणूक करणारे डॉ. सुरेश जाधव विविध शाखांमध्ये यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचे भरभरून मदत करताना योग्य ते सहकार्य संस्था पदाधिकार्यांच्या मदतीने करत आले आहेत. स्वतः उच्चशिक्षित असल्याने त्यांच्या शिक्षणाचा व अनुभवाचा संस्थेच्या गौरवात भर घालणारा ठरेल, असे विचार नूतन सचिव व श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव-पाटील यांनी व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब जाधव यांची निवड झाली. नूतन सचिव मोहनराव जाधव व खजिनदार लक्ष्मणराव जाधव यांचे देखील संस्थेकरिता मोठे योगदान असून, माजी अध्यक्ष विश्वनाथराव जाधव यांनी देखील आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीस नवे उपक्रम राबवून संस्थेचे नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला, असे विचार नूतन अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी मांडून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब जाधव तर खजिनदारपदी लक्ष्मणराव जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संस्था सदस्यांमधून सूर्यकांत जाधव यांची निवड करण्यात आली.
सभेस तत्कालीन संस्था अध्यक्ष विश्वनाथ जाधव, डॉ. सुभाष आगाशे, विश्वस्त विलास जाधव, कॅप्टन विष्णू खटावकर, खजिनदार लक्ष्मण जाधव, योगेश देशमुख, सूर्यकांत जाधव उपस्थित होते.
नूतन संस्था कार्यकारिणीचे विविध शाखांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक तसेच विविध स्तरावरील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.