कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्यासाठी 3.50 कोटीचा निधी मंजूर
खा.श्रीनिवास पाटील यांचे प्रयत्न ; रस्त्याचा दर्जा सुधारणार
Published:4 y 9 m 1 d 15 hrs 49 min 57 sec ago | Updated:4 y 9 m 1 d 15 hrs 49 min 57 sec ago
News By : Muktagiri Web Team
कराड: खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामासाठी साडेतीन कोटीचा भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे कराड शहरातून जाणा-या प्रमुख रस्त्याची सुधारणा होऊन नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. यासह कृष्णा पूलाचे संथ गतीने सुरू असलेले काम, कृष्णा पूला शेजारील रखडलेले संरक्षक भिंतीचे काम, सैदापूर ते ओगलेवाडी रस्त्याच्या बाजूला साठणा-या पाण्यामुळे निर्माण होणारी समस्या, सुर्ली घाटातील रस्त्याच्या कामासह अन्य कामांसाठी खा.श्रीनिवास पाटील हे प्रयत्नशील असून त्याबाबतचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. कराड ते विटा हा मार्ग कराड शहरातून जात असून कोल्हापूर नाका ते कृष्णा पूलापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना प्रवास करताना गैरसोयीचे ठरत आहे. तर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने या मार्गावरील वाहनांसाठी अडथळा निर्माण होऊन शहरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात यावे अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली होती. त्यांनी केलेल्या मागणीनुसार कराड-विटा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.166-ई मार्गावरील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी 3.50 कोटी एवढा भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यातून सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या निधीतून रस्त्याचा दर्जा सुधारण्याचे काम पूर्णत्वास जाणार असल्याने आता कराड शहरातून जाणा-या मार्गाचे रूपडे पालटणार आहे. दरम्यान यासह सध्या कृष्णा पूलाचे काम संथ गतीने सुरू आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, कृष्णा पूला शेजारी संरक्षक भिंत बांधण्यात यावी, पावसाळयात सैदापूर ते ओगलेवाडी रस्त्याच्या दुतर्फा पाणी साठत आहे. साठणा-या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी, सुर्ली घाटातून जाणा-या रस्त्याचे देखील सुधारणा करण्यात यावी यासह अन्य कामांसाठी खा.श्रीनिवास पाटील हे प्रयत्नशील असून त्याबाबतचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.