उंब्रज-कालगांवच्या टोळी प्रमुखासह ६ जणांवर मोक्का
News By : उंब्रज I महेश सुर्यवंशी

सातारा जिल्ह्यातील उंब्रज व कराड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील निगडी व भारती विद्यापीठ पोलीस ठाणेत खुन, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, दरोडयाची तयारी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, अपहरण, आर्म ॲक्ट, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या उंब्रज (कालगाव) ता. कराड येथील टोळी प्रमुखासह अन्य सहा जणांना संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत मोका कारवाईला मंजुरी मिळाली असल्याची माहिती सपोनि अजय गोरड यांनी दिली. टोळी प्रमुख आरोपी मयुर महादेव साळुंखे, (वय३४) रा. कालगांव ता. कराड, टोळी सदस्य पंकज अमृत यादव, (वय२७) रा. भवानवाडी ता. कराड, शाहरुख रफिक मुल्ला, (वय३०)रा. मसुर ता. कराड, सुरज सुर्यकांत जाधव, (वय२८) रा. वाघेश्वर पो मसुर ता. कराड,अमोल बाजीराव जाधव, (वय३१) रा. वाघेश्वर ता. कराड, अक्षय अनिल कोरे, (वय२९) रा. ब्रम्हपुरी, मसुर ता. कराड,प्रकाश आनंदराव यादव, (वय३३) रा. ब्रम्हपुरी, मसुर ता. कराड अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रीत करून दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हे करणा-या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे विभाग यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने उंब्रज (कालगाव) येथील टोळी प्रमुख मयुर साळुंखे याच्यासह अन्य सहा जणांवर उंब्रज व कराड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील निगडी व भारती विद्यापीठ पोलीस ठाणेत खुन, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, दरोडयाची तयारी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, अपहरण, आर्म अॅक्ट, अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल असून टोळी प्रमुख मयुर साळुंखे, याने त्याच्या टोळीची दहशत पसरविण्यासाठी उंब्रज परिसरातील इतर गुन्हेगारांना एकत्र करून दहशत पसरविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सहा. पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी संशयित टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करुन आरोपींच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करीता पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फतीने विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता.सादर केलेल्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली असून नमुद गुन्ह्यात मोक्का कायद्याची कलमे लावून या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२२ पासुन ०६ मोक्का प्रस्तावामध्ये ९९ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली आहे. तसेच १६ इसमांविरुध्द हद्दपारीसारखी व ०१ इसमास एमपीडीए कायदयान्यये स्थानबध्द करण्यात आले आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांचे विरुद्ध मोक्का, हद्दपारी,एमपीडीए अशा प्रकारच्या कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील, स्थागुशा पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि अजय गोरड, पोलिस नाईक अमित सपकाळ, तसेच उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संजय देवकुळे, श्रीधर माने यांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला आहे.