सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून, खटाव तालुक्याला देखील कोरोनाचा विळखा घट्ट बसत चालला आहे. खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पुसेगाव परिसरात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने दक्षता म्हणून ग्रामस्थ, ग्रामपंचायत, महसूल, पोलीस यांनी एकत्र येत पुसेगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला पुसेगाव व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण बाजारपेठेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. बाजारपेठेत श
निढळ : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून, खटाव तालुक्याला देखील कोरोनाचा विळखा घट्ट बसत चालला आहे. खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पुसेगाव परिसरात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने दक्षता म्हणून ग्रामस्थ, ग्रामपंचायत, महसूल, पोलीस यांनी एकत्र येत पुसेगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला पुसेगाव व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण बाजारपेठेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. नेहमी गर्दी असणारी पुसेगावची बाजारपेठ शांत होती.
परिणामी, पुन्हा कोरोनाच्या शिरकावामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने स्वत:च्या कुटुंबासह गावकर्यांच्या आरोग्यासाठी स्वयंस्फूर्तीने सर्व पुसेगावकरांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून एकवटले असल्याचे चित्र येथे पाहावयास मिळाले.
खटाव तालुकाच्या उत्तर विभागातील पुसेगाव ही महत्त्वाची बाजारपेठ असल्याने दररोज आसपासच्या अनेक गावांतील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. त्यातच गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने बाजारपेठेच्या माध्यमातून कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परिणामी, येथील नागरिकांसमोर कोरोनाचा संसर्ग टाळण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुसेगावकरांनी अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ व सर्व व्यवहार बंद ठेवले असून कोणीही कारणाशिवाय घराबाहेर पडणार नाही, याची दक्षता देखील घेतली जात आहे.
दरम्यान, पुसेगाव येथील एका विद्यालयात 25 विद्यार्थी कोरोनाबाधित सापडल्यामुळे पालक वर्ग चिंतेत आहे. सध्या पुसेगावसह परिसरात 28 रुग्ण आहेत.
पुसेगाव परिसरातील कोरोनाची साथ थांबवण्यासाठी आम्ही आमची दुकाने उत्स्फूर्त बंद केली आहेत. आता नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. व आपला पुसेगाव परिसर कोरोनामुक्त राहण्यासाठी प्रयत्न करावा, असे पुसेगाव येथील सह्याद्री वडापावचे मालक व पुसेगावचे ज्येेष्ठ नागरिक शिवाजीराव जाधव यांनी सांगितले.