‘नगरपालिकेची जागा नसताना विकासकामांच्या नावाखाली त्या जागेवर आमदार फंड टाकला जात असून, हा प्रकार खपवून घेणार नाही. या निर्णयाला आमचा विरोध आहे. त्या ठिकाणी आमदार फंड टाकल्यास आम्ही जिल्हाधिकार्यांकडे 308 अन्वये तक्रार करणार असून, सत्ताधारी राजे गटाकडून कोरोना काळात जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे,’ असा गंभीर आरोप फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला आहे.
फलटण : ‘नगरपालिकेची जागा नसताना विकासकामांच्या नावाखाली त्या जागेवर आमदार फंड टाकला जात असून, हा प्रकार खपवून घेणार नाही. या निर्णयाला आमचा विरोध आहे. त्या ठिकाणी आमदार फंड टाकल्यास आम्ही जिल्हाधिकार्यांकडे 308 अन्वये तक्रार करणार असून, सत्ताधारी राजे गटाकडून कोरोना काळात जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे,’ असा गंभीर आरोप फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला आहे.
फलटण येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेली सहा महिने झाले कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालिकेची सर्वसाधारण सभा झाली नाही, ती सभा झाली पाहिजे, अशी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांची मागणी होती. मात्र, एवढ्या लोकांना एकत्र येणे शक्य नसल्याने ही सभा ऑनलाईन पद्धतीने वेबेक्स या अॅपद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) झाली. यामध्ये कोरोना व इतर अशा तब्बल 25 विषयांवर चर्चा झाली.
यामधील 25 पैकी 17 विषयांवर विरोधी गटाने उपसूचना मांडल्या. त्यातील 1 उपसूचना विरोधकांच्या बाजुने मंजूर झाली. सत्ताधारी गटाने सर्व विषय मताच्या जोरावर मंजूर केले. यापैकी आम्ही 17 ठरावाच्या विरोधात 308 प्रमाणे तक्रार करणार आहोत, असे समशेरसिंह यांनी सांगितले आहे.
सध्या फलटण शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपायाकरिता आर्थिक तरतूद केली आहे. त्यास आमचा पाठिंबा असून, लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी एकमुखी मागणी आम्ही केली आहे, असे गटनेते अशोकराव जाधव यांनी सांगितले.
मात्र, शहरातील रिंगरोड व घनकचरा व्यवस्थापन दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 74 असे 1 कोटी 48 लाख रुपये खर्च करण्यास आमचा विरोध असून, तो खर्च म्हणजे सरळसरळ लोकांच्या कररूपी आलेल्या पैशाची धूळधाण आहे. कारण, गेल्या वर्षी घनकचरा व्यवस्थापनसाठी कोट्यवधी रुपये खर्च केला असताना त्या ठिकाणी परत पत्रा शेडसाठी 74 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यास आमचा विरोध असून, आत्तापर्यंत घनकचरा व्यवस्थापनसाठी केलेल्या खर्चाची श्वेत पत्रिका काढावी, अशी मागणी बंडखोर नगरसेवक अनुप शहा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
दरम्यान, शहरातील विकासकामे रखडली असून त्यास ठेकेदार जबाबदार आहेत. मात्र, त्यांना मुदतवाढ मिळावी यासाठी सत्ताधारी गटाने प्रस्ताव मांडला होता. त्यास आमचा विरोध आहे. तसेच अनेक दिवसांतून झालेल्या सर्वसाधारण सभेत इतिवृत्तांत वाचला नाही, असा आरोप सुद्धा विरोधकांनी केला आहे.
दरम्यान, या वेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक यांनी सत्ताधारी गटावर असा आरोप केला आहे की, आमदार फंड हा सर्वांना मिळावा, अशी अपेक्षा असताना सत्ताधारी गटात फक्त सुभद्राराजे नाईक-निंबाळकर यांनाच मिळत असल्याचे दिसून येत आहे. आणि तोही ज्या जागा पालिकेच्या मालकीच्या नाहीत त्या ठिकाणी खर्ची टाकावा, असा अट्टाहास धरला जात आहे. त्यास आमचा विरोध असून अगोदर ती जागा पालिकेने वर्ग करून घ्यावी व मग खर्च करावा. मात्र इथं जागा एकाची आणि तिथं आमदार फंड हे चालू देणार नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले आहे.
सत्ताधारी गटाने शववाहिका व रुग्णवाहिका घेण्यासाठी प्रस्ताव मांडला आहे. त्यास आमचा विरोध नाही. मात्र, अगोदर असलेली भाडेपट्ट्यांच्या वाहनांचा करार रद्द करावा, अशी मागणी केली आहे. अनुकंपा तत्त्वावर मागणीप्रमाणे कर्मचार्यांना सेवेत रुजू करावे, असे आम्ही सांगितले आहे. झालेली बांधकामे क्वालिटी कंट्रोलकडून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा विरोधकांनी केली आहे.
या वेळी गटनेते अशोकराव जाधव, सचिन सूर्यवंशी (बेडके), सचिन अहिवळे उपस्थित होते.
सत्ताधारी गटात अनेक मतभेद झाले आहेत. आम्ही मांडलेल्या उपसूचनेला सत्ताधारी गटातील अनेक नगरसेवकांनी आमच्या बाजूने मतदान केले आहे.
- अनुप शहा, बंडखोर नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस