खटाव तालुक्यात तीन दिवसांत सुमारे 101 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील अनेक लहान, मोठ्या गावांत कोरोनाने चांगलेच हातपाय पसरल्याने कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. या आजाराने आत्तापर्यंत सात जणांचे बळी गेले आहेत.
वडूज : खटाव तालुक्यात तीन दिवसांत सुमारे 101 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील अनेक लहान, मोठ्या गावांत कोरोनाने चांगलेच हातपाय पसरल्याने कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. या आजाराने आत्तापर्यंत सात जणांचे बळी गेले आहेत.
तीन दिवसांपूर्वी खटाव तालुक्यात एकाच दिवशी सुमारे 49 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामध्ये अंबवडे 4, मायणी 11, बोबडे गल्ली 1, वडूज 10, ललगुण 1, पुसेसावळी 6, डांभेवाडी 2, येरळवाडी 1, पुसेगाव 2, बुध 1, निढळ 1, निमसोड 1, कानकात्रे 1, शेटफळे 1 येथील रुग्णांचा समावेश आहे. दुसर्या दिवशी दोन रुग्ण सापडले. तर तिसर्या दिवशी विक्रमी संख्येने 49 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मायणी मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी करण्यात आलेल्या मायणी येथील 8, कातरखटाव येथील 10 तसेच चोराडे येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तर पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोव्हिड सेंटरमध्ये रॅपिड तपासणीमध्ये 26 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
दरम्यान, कोरोना आजाराचे उपचार सुरू असणार्या रुग्णांपैकी सात जणांचे बळी गेले आहेत. यामध्ये वडूज येथील एक पुरुष व एक महिला तसेच मोळ, पुसेगाव, पुसेसावळी आणि डांभेवाडी येथील रुग्णांचा समावेश आहे. या प्रकारामुळे वडूज परिसरात चांगलाच हाहाकार माजला आहे. कोरोनाने पहिल्यांदा मुलानवाडा टार्गेट केला होता. त्यानंतर वडूज-कराड रस्त्यावरील नवीन बाजारपेठेतील अनेक व्यापार्यांना कोरोनाची लागण झाली होती. या पेठेतच दुकान असणार्या परंतु वाकेश्वर रस्त्यावरील मस्जीद परिसरातील एका कुटुंबाला कोरोनाने ग्रासले आहे. या कुटुंबातील एका 65 वर्षीय महिलेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यापूर्वीच उपनगरातील एका नागरिकाचा सातारा येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची चर्चा आहे. आता कोरोनाने आपला मोर्चा जुन्या बाजारपेठेकडे वळवला आहे. पेठेतील एका घरातील पती-पत्नींना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या बाजारपेठेतील अनेक दुकानांसमोर बॅरिकेट लावल्याने ऐन गणेशोत्सव काळात व्यापार्यांची चांगलीच कुचंबना झाली आहे. तर डांभेवाडी परिसरात खासगी वैद्यकीय उपचार करणार्या एका डॉक्टरचाही कोरोनाने बळी गेला आहे. या 45 वर्षीय युवकास वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्याने त्यांचा बळी गेल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
येरळवाडीतील गरोदर मातेस लागण
येरळवाडी येथे अंदाजे 27 वर्षीय गरोदर मातेस कोरोनाची लागण झाली आहे. चार दिवसांवर बाळंतपणाची तारीख आली असताना कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबीयांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या त्या महिलेवर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कातरखटाव येथील देवापुरे वस्तीवरील दोन बंधूंच्या कुटुंबास कोरोनाने गाठले असून, या कुटुंबातील एकूण दहाजण बाधित झाले आहेत.