खटाव पंचायत समिती यांच्यामार्फत प्रतिवर्षी देण्यात येत असलेला ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाचामळा (कानकात्रे) येथील उपशिक्षिका कुंदा अशोक लोखंडे-कांबळे यांना अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ यांच्या उपस्थितीत देऊन गौरवण्यात आले.
मायणी : खटाव पंचायत समिती यांच्यामार्फत प्रतिवर्षी देण्यात येत असलेला ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाचामळा (कानकात्रे) येथील उपशिक्षिका कुंदा अशोक लोखंडे-कांबळे यांना अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ यांच्या उपस्थितीत देऊन गौरवण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
कुंदा लोखंडे -कांबळे यांनी आपल्या अठरा वर्षाच्या कारकिर्दीत सुरुवातीला परभणी व त्यानंतर खटाव तालुक्यात शैक्षणिक कार्य करत असताना विविध उपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. शैक्षणिक उठावातून शाळेसाठी भौतिक सोयी सुविधा, शैक्षणिक साहित्य निर्मिती ,शिष्यवृत्ती तसेच क्रीडा स्पर्धा, गीतमंच, पालक मेळावे आदी बाबतीत कार्य केले आहे. याशिवाय त्यांनी कविता लेखन व इतर शैक्षणिक लेखांचे लेखन करून साहित्यिक योगदान दिले आहे.
यावेळी जिल्हा परिषद शाळा चितळी येथील शिक्षक संजय जगन्नाथ पाटोळे व पडळ येथील खरसिंगे शाळेवर असणारे राजेंद्र बबन सानप यांना पण यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी आमदार प्रभाकर घार्गे, सभापती जयश्री कदम, उपसभापती हिराचंद पवार, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे ,विस्ताराधिकारी लक्ष्मण पिसे उपस्थित होते.
कुंदा लोखंडे-कांबळे यांचे डॉ. सयाजीराजे मोकाशी, डॉ. श्यामसुंदर मिरजकर, डॉ. रवींद्र श्रावस्ती, डॉ. मानसी जगदाळे, प्रा. डॉ. सुनीता रोकडे, लेखक संपत मोरे, केंद्रप्रमुख मोहन साळुंखे, धनाजी साळुंखे, शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
आबासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले.