कराड तालुक्यातील वराडे नजीक पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खैर प्रजातीची वृक्षतोड करून त्यापासून माल तयार करून त्याची वाहतुक करणारा ट्रक व ट्रकचालकास वनविभागाने ताब्यात घेतले. ही कारवाई गुरूवारी केली. यामध्ये वनविभागाने साडे चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. वनविभागाने कारवाईचा धडाका लावला असून सलग दुसर्या दिवशी वनविभागाने ही कारवाई केली.
भोलानाथ धरमराज यादव (वय 44, रा. आझादनगर, डोंगरकलिया शिवमंदिर डुंगरा वाकी, ता. पारडी, जि. वल्साद गुजरात) असे ताब्यात घेतलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी, वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक पुणे-बेंगलोर महामार्गावर रोडगस्त करत असताना त्यांना एका ट्रकचा संशय आला. त्यांना त्या ट्रकला थांबवून त्याची पाहणी केली असता ट्रकमध्ये विनापरवाना वाहतुक खैर प्रजातीचा सोलीव माल असल्याचे आढळून आले. याप्रकरणी वनविभागाने ट्रकचालकास 4 लाख 67 52 च्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. सदरची कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुणे यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनपाल रमेश कुंभार, वनकर्मचारी ए. एन. जाधव, डी. एच. अवघडे, शि. ज. पाटील, शंभूराज माने, श्रीकांत चव्हाण यांनी केली. अधिक तपास उपवनसंरक्षक महादेव मोहिते करीत आहेत.