ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीत भाजपाची ताकद दाखवा : डॉ. सुरभी भोसले
News By : Muktagiri Web Team

कराड, : भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकाची काळजी घेत आहे. आता आपण ग्रामपंचायत निवडणूक ते लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विजयी करून पक्षाची ताकद दाखवून द्यावी, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष डॉ. सुरभी भोसले यांनी केले. कोयना वसाहत (ता. कराड) येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस मनिषा पांडे, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सारिका गावडे, कराड तालुकाध्यक्ष शामबाला घोडके, स्वाती पिसाळ, रिना भणगे, कोयना वसाहतीच्या सरपंच सुवर्णा वळीव यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. भोसले पुढे म्हणाल्या, भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणार पक्ष आहे. कराड तालुक्यातील पक्षसंघटन मजबूत असून, महिला मोर्चाही चांगले काम करत आहे. येत्या निवडणुकीत आपण कराड दक्षिणचे नेते डॉ. अतुल भोसले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करायचे, असा निर्धार करून पक्षसंघटना अधिक मजबूत करूया. यावेळी रोहिणी शिंदे, शामबाला घोडके, डॉ. सारिका गावडे, माजी जिल्हाध्यक्षा कविता कचरे, सुरेखा माने, सुवर्णा कापूरकर आदींनी मनोगते व्यक्त केली. सीमा घार्गे, मंजिरी कुलकर्णी, दैवशीला मोहिते, सुरेखा माने, सुवर्णा कापूरकर, मालती माने यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.