गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने खटाव तालुक्याच्या 60 टक्के भागाला वरदान ठरलेल्या नेर तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल पाणीसाठ्यात सात फूट वाढ झाली आहे. परिणामी नेर, पुसेगाव, खटाव, भुरकवडी, कुरोली सिद्धेश्वरसह येरळवाडी पर्यंतच्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुसेगाव : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने खटाव तालुक्याच्या 60 टक्के भागाला वरदान ठरलेल्या नेर तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल पाणीसाठ्यात सात फूट वाढ झाली आहे. परिणामी नेर, पुसेगाव, खटाव, भुरकवडी, कुरोली सिद्धेश्वरसह येरळवाडी पर्यंतच्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेर परिसरात पडत असलेल्या संततधार पावसाने तलावात 42 टक्के पाणीसाठा झाला आहे. सद्य:स्थितीत नदी, ओढ्यांच्या मार्गाने तलावात पाण्याचा ओघ सुरू असल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. यामुळे अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
या धरणावरती 22 गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तसेच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यावर या पाण्यावर रब्बी हंगामातील एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली येते. पावसाचा जोर कायम राहिल्यास बारा ते पंधरा दिवसांत तलाव भरण्याची शक्यता निर्माण झाल्याने खटाव तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.