कोणताही फाळकुट दादा कोणाकडे हप्ता मागत असेल तर त्याबाबत कराड शहर पोलीसांना माहीती दयावी. अशा फाळकुट दादांचा कायमचा बंदोबस्त करणार असून अशा लोकांची माहीती अभिलेख पडताळणेचे काम चालु असुन भविष्यात त्यांच्यावर हददपारी सारख्या कडक कारवाया करणेत येणार आहेत. - प्रदीप सुर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 18 ः मलकापूरात दहशत माजवून खंडणी मागणाऱ्या चौघांना कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्र, मोटारसायकल व दुचाकी असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. फजल उर्फ पप्पु लियाकत पठाण, शंतनु मानसिंग खराडे, रोहीत सुभाष पवार व मारुती सपेरा धोत्रे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मलकापूर येथील राहुल राजेंद्र्र मासाळ यांचे आर. एम. मेन्सवेअर नावाचे कपड्याचे दुकान आहे. गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फजल उर्फ पप्पु लियाकत पठाण, शंतनु मानसिंग खराडे, रोहीत सुभाष पवार व मारुती सपेरा धोत्रे यांनी दुकानासमोर येऊन राहुल्या बाहेर ये, तुला मस्ती आलीया, तुला आज घोडाच लावतो, माझ्या गँगला व मला तुझ्याकडून 5 हजार रूपये हप्ता पाहिजे, चल काढ हप्ता असे म्हणून आरडाओरडा, शिवीगाळ, दमदाटी करीत दहशत माजवून दुकानात घुसून चाकूचा धाक दाखवत खिशातील रोकड काढून घेऊन राहुल मासाळ यांना चाकूने गंभीर दुखापत केली. याबाबत राहहुल मासाळ यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिस मलकापूर शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती समजली की चौघेही संशयित मलकापूर शहरात फिरत आहे. पोलिसांनी सापळा रचून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र, दुचाकी व जबरीने चोरून नेलेली रोकड जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विभुते, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केली.