कोल्हापूरच्या फौजदाराकडून चालत्या बसमध्ये अल्पवयीन युवतीचा विनयभंग ; बोरगाव पोलीसात गुन्हा दाखल
News By : Muktagiri Web Team

नागठाणे -सातारा येथे पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदाराने स्पर्धा संपल्यानंतर कोल्हापूरला परत जात असताना चालत्या बसमध्ये एका अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करण्याची घटना सोमवारी सकाळी घडली.महामार्गावर वळसे ते काशीळ दरम्यान ही घटना घडली.पीडित युवतीने याबाबत कराड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.ही फिर्याद 0 ने सोमवारी रात्री उशिरा कराड शहर पोलीस ठाण्याकडून बोरगाव पोलीस ठाण्यात वर्ग झाली.महेश मारुती मगदूम असे या सहाय्यक फौजदाराचे नाव असुन तो कोल्हापूर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहे. याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पीडित अल्पवयीन युवती ही सातारा शहरातील असून ती शिक्षणासाठी कराड येथे रहावयास आहे.सोमवारी पीडित युवतीची परीक्षा असल्याने सकाळी ८.३० वाजता बारामती-कोल्हापूर बसने कराडकडे जायला निघाली होती.काही वेळात एक अनोळखी इसम तिच्या शेजारी येऊन बसला. काही वेळाने संबंधिताने या युवतीस नाव,गाव विचारत बोलण्यास सुरवात केली.त्यानंतर त्याने आपण कोल्हापूरला पोलीस असल्याचे सांगून "आपण फ्रेंड्स बनू,चॅटिंग करू" असे बोलून मोबाईल नंबर मागितला.पीडितेने नंबर देण्यास नकार देत कानात हेडफोन घालून त्याच्याकडे दुर्लक्ष केले.मात्र काही वेळात त्याने तिच्या अंगास स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील चाळे सुरू केले.यावेळी काशीळ गावाजवळ पीडितेने संबंधिताला दुसऱ्या ठिकाणी बसण्यास सांगितले. दरम्यान,घडलेल्या घटनेची माहिती पीडितेने कराड येथील वर्गमित्र व कुटुंबियांना दिली व कराड बस स्थानकातील पोलिसांनाही माहिती दिली.पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केल्यावर त्याचे नाव महेश मारुती मगदूम असल्याचे व तो कोल्हापूर पोलीस असल्याचे निष्पन्न झाले.या घटनेची फिर्याद पीडितेने कराड शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर रात्री उशिरा हा गुन्हा बोरगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.संशयित साहाय्यक फौजदार महेश मगदूम याला बोरगाव पोलिसांनी नोटीस दिली आहे.घटनेचा पुढील तपास सपोनि चेतन मछले करत आहेत.