सुरवडी-साखरवाडी रस्त्यावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत चालली असून, हा रस्ता अवजड वाहतुकीमुळे जागोजागी खचला आहे. रस्त्यावर जागोजागी अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना या खड्ड्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
साखरवाडी : सुरवडी-साखरवाडी रस्त्यावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत चालली असून, हा रस्ता अवजड वाहतुकीमुळे जागोजागी खचला आहे. रस्त्यावर जागोजागी अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना या खड्ड्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
सुरवडी येथे औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यापासून या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. कमिन्स कंपनीच्या माध्यमातून या भागाचा कायापालट झाला आहे. सुरवडी पंचक्रोशी व होळ, साखरवाडी, पिंपळवाडी, खामगाव मुरूम तसेच पुणे जिल्ह्यातून कंपनीच्या कामानिमित्त येणार्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्याही तेवढीच आहे.
सुरवडी ते साखरवाडी अवघे चार किलोमीटर अंतर असून, साखरवाडी येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे कमिन्स कंपनीचे कामगार व सुरवडी गावातील नागरिकांना साखरवाडी बाजारपेठेकडे दैनंदिन कामानिमित्त नेहमीच धाव घ्यावी लागते तसेच याच रस्त्यावरून सध्या अवजड वाहनांची वाहतूक वाढलेली आहे. सुरवडी येथे दिवसेंदिवस औद्योगिकीकरण वाढत चालले असून सुरवडी-साखरवाडी रस्त्यावरही औद्योगिकीकरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील अवजड वाहतूक याच रस्त्यावरून होत असल्याने रस्ता वारंवार खचला आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या खचलेल्या खड्ड्यातून पाणी साठून रस्ता नादुरुस्त झाला आहे.
या खड्ड्यातून मार्ग काढताना अवजड वाहतुकीला मोठा अडथळा होत असल्यामुळे अरुंद रस्त्याच्या मार्गातून जाणार्या व येणार्या वाहनांना छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. साखरवाडी येथे साखर कारखाना असल्यामुळे लवकरच गळीत हंगाम चालू होणार असून, त्यामुळे बारामती, फलटण, खंडाळा, लोणंद, पुणे, सातारा जिल्ह्यातून या साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक होत असते.
बारामती-शिरवळ हा रस्ता चौपदरीकरणाच्या माध्यमातून तयार झाला असल्याने या मार्गावर वाहतूक वाढली आहे. तेथूनच सुरवडी मार्गे साखरवाडीकडे मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक होत असते तसेच कारखान्याच्या कामानिमित्त ही त्या मार्गावरूनच अवजड वाहने ही ये-जा करत असल्याने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त होण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.