शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने पुसेगावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या गावात बाजारपेठेतील काही व्यापार्यांसह तब्बल 51 जण अॅक्टिव्ह रुग्ण असल्याने बुधवार, दि. 21 पासून सोमवारपर्यंत सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय पोलीस, ग्रामपंचायत, व्यापारी आणि दक्षता समितीने घेतला.
निढळ : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने पुसेगावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या गावात बाजारपेठेतील काही व्यापार्यांसह तब्बल 51 जण अॅक्टिव्ह रुग्ण असल्याने बुधवार, दि. 21 पासून सोमवारपर्यंत सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय पोलीस, ग्रामपंचायत, व्यापारी आणि दक्षता समितीने घेतला.
गेल्या 15 दिवसांपासून पुसेगावातील कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. एकेका दिवशी 12 किंवा 13 रुग्णांची वाढ होऊनही काही पुसेगावकर कोरोना प्रादुर्भावाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. राज्य शासनाकडून काही निर्बंध लादण्यात आले असले तरी पुसेगावमधील बहुतांशी व्यापारी, व्यावसायिक पळवाटा शोधून सर्व निर्बंध पायदळी तुडवत आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून बंद ठेवायचे अनेक उद्योग चोरी छुपे सुरू असल्याने गावातील आणि आसपासच्या भागातील नागरिकांची वर्दळ नेहमीप्रमाणेच सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुसेगावमध्ये बाधितांची संख्या वाढून 51 वर पोहोचली तरी परिस्थितीत काही फरक पडत नसल्याने पोलीस, ग्रामपंचायत, व्यापारी आणि दक्षता समितीने बुधवारपासून सोमवारपर्यंत सहा दिवस गावात कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
या कालावधीत फक्त औषध दुकाने, दवाखाने आणि दूध संकलन केंद्रे सुरू राहणार आहेत. सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव आणि त्यांच्या सहकार्यांनी लॉकडाऊनला सहकार्य करण्याविषयी व्यापारी आणि व्यावसायिकांना सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.