पिस्टल व गावठी कट्ट्याची विक्री करणारा जेरबंद
कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी ः संशयितास तीन दिवस पोलीस कोठडी
Published:Mar 16, 2021 03:11 PM | Updated:Mar 16, 2021 03:11 PM
News By : Muktagiri Web Team
कराड ः कोपर्डे हवेली ता. कराड येथे पिस्टल व गावठी कट्ट्याची विक्री करण्यास आलेल्या एकास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून पिस्टलसह गावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे अशी 1 लाख 20 हजारांची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अभिजीत उर्फ पप्पू लक्ष्मण मोरे (वय 25, रा. तारगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोपर्डे हवेलीत एकजण पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, उत्तम कोळी, शशिकांत घाडगे, अमोल हसबे यांनी तेथे सापळा रचला. जर्किन व काळ्या रंगाची पँट असा पेहराव केलेला संशयित दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कंबरेला डाव्या बाजूस एक देशी बनावटीचे स्टीलचे पिस्टल त्यास लाकडाच्या चॉकलेटी रंगाचा बट कव्हर अडकवलेले आढळून आले. तर उजव्या बाजुला लोखंडी मॅग्झीनसह व एक देशी बनावटीचा धातूचा गावठी कट्टा लाकडाची चॉकलेटी रंगाची मुठ असलेला सापडला. खिशात दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी हे करीत असुन त्याने कोठून अग्निशस्त्रे आणली व कोणाला विक्री करणार होता याबाबत तपास चालु असुन त्यास मा. न्यायालयात भेटविले असता त्यास 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. वरील कामगिरी पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल तसेच अपर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील व पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे उत्तम कोळी, शशिकांत घाडगे, अमोल हसबे यांनी केली.