कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजय दिवस समारोह स्थगीत करण्यात आला आहे. मात्र जवानांच्या सन्मानार्थ आणि राज्यातील रक्ताचा तुटवडा विचारात घेवुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विजय दिवस समारोह समितीच्यावतीने मंगळवारी (ता. १५) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
कराड ः भारतीय सैन्यदलाने बांग्लामुक्ती संग्रामात मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून गेली २२ वर्षे येथे विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम स्थगीत करण्यात आला आहे. मात्र जवानांच्या सन्मानार्थ आणि राज्यातील रक्ताचा तुटवडा विचारात घेवुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विजय दिवस समारोह समितीच्यावतीने मंगळवारी (ता. १५) भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहीती समितीच्यावतीने प्रा. बी. एस. खोत, रमेश पवार यांनी आज दिली. विजय दिवस समारोह समितीच्यावतीने आयोजीत रक्तदान शिबीराची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विनायक विभूते, तळबीडचे सरपंच जयवंतराव मोहिते, समितीचे सहसचीव विलासराव जाधव, प्राचार्य सतीश घाटगे , बी.जे. जाधव आदी उपस्थित होते. प्रा. खोत म्हणाले, भारतीय सैन्यदलाच्या विजयाचे साक्षीदार असेलेल्या कर्नल पाटील यांच्या पुढाकारातुन येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयम व परिसरात दरवर्षी विजय दिवस समारोह समितीच्यावतीने भारतीय सैन्यदलाच्या सहकार्याने १३ ते १६ डिसेंबर दरम्यान विजय दिवस समारोहाचे आयोजन करण्यात येते. देशात दिल्लीनंतर फक्त तो कऱ्हाडमध्ये साजरा केला जातो. त्यामुळे त्याला मोठे महत्व आहे. विजय दिवस समारोहासाठी दरवर्षी लष्करी शस्त्रास्त्र, जवान, बॅण्डपथक, श्वानपथक आदींच्या चित्तथरारक कसरतींचेही आयोजन केले जाते. त्याला सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो आबालवृध्द उपस्थीत राहतात. विजय दिवस हा कऱ्हाडची ओळख बनला आहे. दरवर्षी वेगवेगळ्या कसरतींनी आणि कार्यक्रमांनी गेली २२ वर्षे हा विजय दिवसचा सोहळा अविस्मरणीय ठरतो. त्यामुळेच त्याची लोकप्रतियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र यंदा कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. त्यावर सध्यातरी सोशल डिस्टन्सींग एवढाच पर्याय आहे. त्याचा विचार करुन विजय दिवस समारोह समितीच्यावतीने यंदाचा विजय दिवस समारोहाचा कार्यक्रम स्थगीत करण्यात आला आहे. मात्र सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्याचा विचार करुन विजय दिवस समितीच्यावतीने जवानांच्या सन्मानार्थ मंगळवारी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये रक्तदात्यांना मोठ्या प्रमाणात रक्तदान करुन राष्ट्रीय कर्तव्यास हातभार लावावा व अधिक माहितीसाठी 9049843131 यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. खोत व श्री. पवार यांनी केले आहे. भरत कदम यांनी आभार मानले.