रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी खा. रणजितसिंह यांनी केलेले प्रयत्न अभिमानास्पद
News By : Muktagiri Web Team
फलटण : ‘दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी पाहिलेले फलटणच्या रेल्वेचे स्वप्न त्यांचे सुपुत्र खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पूर्ण केले असून, फलटण-पुणे रेल्वे सुरू झाल्यामुळे या भागाच्या विकासाला आणि प्रगतीला हातभार लागणार आहे. रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी खा. रणजितसिंह यांनी केलेले प्रयत्न अभिमानास्पद आहेत,’ असे मत केंद्रीय पर्यावरण, वन, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
फलटण येथील रेल्वे स्टेशनवर फलटण ते पुणे ट्रेनच्या व्हिडिओ लिंकद्वारे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, खा. उदयनराजे भोसले, खा. गिरीश बापट, मध्य रेल्वेचे व्यवस्थापक सुनील मित्तल, पुणे विभागाच्या रेल प्रबंधक रेणू शर्मा, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, मंदाकिनी नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, रेल्वेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
पूर्वी मी पुणे पदवीधर मतदार संघाचा आमदार असताना फलटणला वारंवार येत होतो. त्यावेळी माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांची भेट होत असे. त्यावेळी फलटणच्या रेल्वेसाठी सातत्याने ते आग्रही असायचे, त्यांनी रेल्वेचे पाहिलेले स्वप्न त्यांचे सुपुत्र विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पूर्ण केल्याबद्दल समाधान वाटत असून, फलटण-पुणे रेल्वेद्वारे एकमेकांशी सरळ जोडले गेल्याने या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे तसेच शेतकर्यांच्या मालाला ही चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.
केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार आल्यापासून मोठ्या प्रमाणात जनहिताची कामे सुरू असून, रेल्वेचा पूर्णपणे चेहरामोहरा बदलला गेला आहे. सर्व रेल्वे स्टेशन स्वच्छ होण्याबरोबरच वाय-फायद्वारे सुसज्ज झाली आहेत. अनेक रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करण्यात येऊन प्रवाशांना रेल्वेमध्ये अनेक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. रेल्वेचे बजेट मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले असून, आमच्या सरकारच्या काळात रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रगती केल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
फलटणच्या रेल्वेसाठी माझे वडील दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी मोठा संघर्ष केला. त्यांचे स्वप्न फलटण ते पुणे रेल्वेद्वारे आज पूर्ण होत असून, फलटण व आजूबाजूच्या औद्योगिकीकरणाला, छोटे-मोठे उद्योगधंदे, शेतकरी यांच्या मालाला निश्चितच फायदा रेल्वेच्या वाहतुकीमुळे होणार आहे. लवकरच फलटण ते बारामती आणि फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम सुरू होणार आहे. रेल्वेसाठी 23 वर्षे सतत संघर्ष करणारे माझे वडील दिवंगत हिंदुराव नाईक-निंबाळकर आज आपल्यात नसल्याने त्यांची उणीव उद्घाटन कार्यक्रमाला जाणवत असल्याची खंत खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.
फलटण सारख्या दुष्काळी तालुक्यात रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेचे सर्व अधिकारी यांचे मोठे योगदान असून गेले वर्षभर कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रेल्वेसेवा बंद असतानाही फलटण ते पुणे रेल्वे सुरू करून रेल्वे मंत्रालयाने फलटणकरांना अनोखी भेट दिली आहे. फलटणची जनता ही कायम रेल्वे अधिकार्यांची ऋणी राहील, असे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
फलटण-पुणे रेल्वेला स्व. हिंदुरावांचे नाव द्यावे : खा. उदयनराजे भोसले
फलटणच्या रेल्वेसाठी संपूर्ण हयातभर संघर्ष करणारे दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे नाव फलटण-पुणे रेल्वेला देण्यासाठी रेल्वे अधिकार्यांनी जरूर प्रयत्न करावेत. रेल्वे हे विकासाचे दालन असून गोरगरीब जनता, विद्यार्थी यांना प्रवासासाठी रेल्वे फायदेमंद आहे. रेल्वे अधिकार्यांनी कराड सातारा पुणे अशी लोकल सेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न करावेत तसेच सातारा जिल्ह्यातील रेल्वेचे प्रलंबित सर्व प्रश्न सोडवावेत, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी करून रेल्वेसेवा सुरू झाल्याबद्दल फलटणच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.