यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुका मोठ्या चुरशीने पार पडल्या. यात अनेक युवा वर्गाची राजकारणात झालेली एन्ट्री गावच्या विकासाला पारंपरिक चाकोरीमधून आधुनिक विकासाच्या परिवर्तनाकडे नेणारी ठरणार आहे. याप्रमाणेच अनफळे (ता. खटाव) या दुर्लक्षित असणार्या छोट्याशा गावाच्या विकासासाठी गावातील सुपुत्र स्वप्नील कांबळे यांनी पत्रकारितेच्या प्रवाहातून थेट निवडणुकीत बिनविरोध होत राजकारणात एन्ट्री केली आहे.
मायणी : यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुका मोठ्या चुरशीने पार पडल्या. यात अनेक युवा वर्गाची राजकारणात झालेली एन्ट्री गावच्या विकासाला पारंपरिक चाकोरीमधून आधुनिक विकासाच्या परिवर्तनाकडे नेणारी ठरणार आहे. याप्रमाणेच अनफळे (ता. खटाव) या दुर्लक्षित असणार्या छोट्याशा गावाच्या विकासासाठी गावातील सुपुत्र स्वप्नील कांबळे यांनी पत्रकारितेच्या प्रवाहातून थेट निवडणुकीत बिनविरोध होत राजकारणात एन्ट्री केली आहे.
खटाव तालुक्यातील मायणी या सर्व क्षेत्रात अग्रेसर असणार्या मातब्बर गावाच्या लगत मायणी गावच्या एखाद्या वस्तीप्रमाणे असणारे तारळी प्रकल्पाच्या नादुरुस्त कालव्याच्या शेवटच्या टोकावरील ‘अनफळे’ हे गाव! सध्याच्या आधुनिक युगात पारंपरिक पद्धतीने शांततेने वाटचाल करणारे हे गाव दरवर्षी उन्हाळ्यात सर्वप्रथम पाणीप्रश्नांसाठी चर्चेत येते.
देशसेवा करून आकस्मिक निधन झालेल्या माजी सैनिक आबासो कांबळे यांचे सुपुत्र असणारे स्वप्नील कांबळे यांनी आपल्या शैक्षणिक प्रवास संपवून सामाजिक प्रश्नासाठी पत्रकारितेचा प्रवाह स्वीकारत आपली वाटचाल सुरू केले. थोरली बहिणी जयश्री कांबळे यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड होऊन त्यांनी वडिलांप्रमाणे देशसेवेचे व्रत अंगीकारले असून, धाकटे बंधू राहुल कांबळे यांनी होळीचागाव (ता. खटाव) याठिकाणी छोट्याच्या खेड्यात मेडिकल सुविधा उपलब्ध केली आहे. याठिकाणी नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन या मेडिकल सुविधेबद्दल कांबळे बंधूंच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
गरीब कुटुंबातून पुढे येत पत्रकार बनलेल्या स्वप्नील कांबळे यांनी शासनदरबारी गावासह मायणी परिसराच्या विविध प्रश्नांची मांडणी सुरू केली. परंतु आपण स्वतः गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीमार्फत कार्य करू शकतो, हा विश्वास त्यांना वाटल्याने त्यांनी यंदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांना नशिबाची साथ मिळत, अनफळे ग्रामपंचायतच बिनविरोध झाली. यामुळे कांबळे यांची राजकारणातील पहिलीच टर्म थेट बिनविरोध होत गावच्या राजकारणात दमदार एन्ट्री झाली आहे.
गावचा पाणीप्रश्न व शासनाच्या अनेक योजना स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांच्या मदतीने गावात राबवून अनफळे गावास जिल्ह्याच्या पटलावर नावलौकिक मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया नूतन ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील कांबळे यांनी दिली आहे.
अनफळे सरपंचपदी सुनीता यलमर तर उपसरपंचपदी पमाबाई यलमर
2021च्या पार पडलेल्या निवडणुकांची लांबलेली सरपंच निवड शासन निर्णयामुळे मार्गी लागली असून, अनफळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता यलमर तर उपसरपंचपदी पमाबाई यलमर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुरवठा विभागाचे शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शांततेत निवड प्रकिया पार पडली. यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील कांबळे, बाबासो आडके, अर्चना चव्हाण, पूनम वाडकर, तुषार कंद्रे, ग्रामसेवक महादेव काळे, तलाठी शिल्पा गोरे उपस्थिती होती.