‘येथील माजी सैनिक संघटनेने बांधलेले सैनिक भवन खटाव-माण तालुक्यासह जिल्ह्यातील सैनिकांसाठी आदर्शवत ठरेल,’ असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी केले.
औंध : ‘येथील माजी सैनिक संघटनेने बांधलेले सैनिक भवन खटाव-माण तालुक्यासह जिल्ह्यातील सैनिकांसाठी आदर्शवत ठरेल,’ असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी केले.
औंध येथील सैनिक भवनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी सरपंच सोनाली मिठारी, सैनिक संघटनेचे अध्यक्ष जयसिंग घार्गे, उपाध्यक्ष वसंत पवार, सचिव धनाजी आमले, आलीम मोदी, राजाभाऊ देशमुख, वसंतबाबा गोसावी, चंद्रकांत पवार, संदीप इंगळे, पोपट कुंभार, संजय भोसले, गणेश चव्हाण, सावता यादव, नामदेव भोसले, बंडा पाटील, चाँदशा काझी, संभाजी कुंभार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
डॉ. येळगावकर म्हणाले, ‘सैनिक व आपले नाते अतिशय जिव्हाळ्याचे आहे. त्यामुळे आजी-माजी सैनिकांची कोणतीही अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. कोणत्याही क्षेत्रात शिस्त आणावयाची असेल तर सैनिकी बाणा अंमलात आणणे गरजेचे आहे. खटाव-माण तालुक्यांतील सैनिकांच्या कँटीनचा प्रश्न मार्गी लावला असून, औंध येथील माजी सैनिकांनी सैनिक भवन उभे करून एक चांगले व्यासपीठ निमाण केले आहे. यापुढे औंध भागातील सैनिकांसह सोळा गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचा पुनरुच्चार ही त्यांनी केला.’
विकासकामांना गती द्यावयाची असेल तर ग्रामस्थांची एकी महत्त्वाची आहे. औंध ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकीचे त्यांनी या वेळी कौतुक केले.
धनाजी आमले यांनी डॉ. येळगावकर यांच्या पाठपुराव्यामुळे सैनिक भवनला दहा लाख रुपये निधी मिळाल्याचे सांगितले तसेच यापुढे सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.
या वेळी सोनाली मिठारी, आलीम मोदी, राजाभाऊ देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला माजी सैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनाजी आमले यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी कुंभार यांनी आभार मानले.