देऊर, ता. कोरेगाव येथील एकाच दिवशी 23 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने, गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. एकट्या गावाचा एकूण बाधितांचा आकडा 54 झाला आहे. अर्धशतकाच्या पुढे गेल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने गावासह भागात चिंतेचे वातावरण झाले आहे.
पिंपोडे बुद्रुक : देऊर, ता. कोरेगाव येथील एकाच दिवशी 23 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने, गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. एकट्या गावाचा एकूण बाधितांचा आकडा 54 झाला आहे. अर्धशतकाच्या पुढे गेल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने गावासह भागात चिंतेचे वातावरण झाले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र पळशी अंतर्गत पळशी येथे शुक्रवार, दि. 21 रोजी घेण्यात आलेल्या शिबिरात रॅपिड अँटीजेन कोरोना तपासणीत एकंदरीत हाय रिस्कमधील शंभर संशयितांची तपासणी तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली जाधव यांनी व वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश शेंडगे तसेच सर्व आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी पळशी येथे केली. रॅपिड अँटीजेन कोरोना तपासणीत शंभर संशयित रुग्णांपैकी एकंदरीत 26 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी देऊर गावातील 23 रुग्ण व गुजरवाडी येथील 2 रुग्ण तसेच कोलवडी येथील 1 रुग्ण आढळून आले.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देऊर गावातील काही लोक लग्नकार्यासाठी सातारा या ठिकाणी गेले होते. लग्न आटोपून आल्यानंतर एक-दोन दिवसांनंतर त्यांना त्रास जाणवू लागला म्हणून आरोग्य विभागाने त्यांची कोरोना तपासणी केली असता त्यांच्या कुटुंबातील सात ते आठ जण पॉझिटिव्ह सापडले. तर इतर बाधित अंत्यविधी कार्यक्रम व इतर वेगवेगळ्या कारणाने बाधित झाले आहेत. देऊर गाव हे अगोदरच ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये असल्यामुळे हाय रिस्कमधील एकमेकाचा संपर्क झाल्यामुळे इतर कोरोनाबाधित रुग्ण तपासणीत आढळून आले.
रॅपिड अँटीजेन तपासणीकरिता देऊरमधील हाय रिस्क 70 ते 75 संशयित रुग्णांची कोरोना तपासणी केली असता त्यामध्ये फक्त देऊर गावचे एकूण 23 रुग्ण कोरोनाबाधित सापडले. देऊर व इतर गावांतील शंभर संशयित रुग्ण तपासले असता सदरच्या तपासणीत एकंदरीत 14 पुरुष व 12 महिलांचा समावेश आहे. आरोग्य विभागाकडून तसेच स्थानिक कोरोना ग्राम समिती यांच्यावतीने रुग्ण सापडलेला परिसर सील करण्यात आलेला आहे तसेच आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.