‘कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी लोकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतल्यास या संकटावर मात करणे अवघड नाही. ग्रामस्तरावर लोकांनी स्वत:हून पुढाकार घेतल्यास संसर्गाची चेन ब्रेक होण्यास मदत होईल. परंतु, हे काम करत असताना कोणी गावचे राजकारण पुढे आणू नका, असे करणार्याला पाप लागेल,’ असे मत खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी व्यक्त केले.
वडूज : ‘कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी लोकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतल्यास या संकटावर मात करणे अवघड नाही. ग्रामस्तरावर लोकांनी स्वत:हून पुढाकार घेतल्यास संसर्गाची चेन ब्रेक होण्यास मदत होईल. परंतु, हे काम करत असताना कोणी गावचे राजकारण पुढे आणू नका, असे करणार्याला पाप लागेल,’ असे मत खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी व्यक्त केले.
कान्हरवाडी (ता. खटाव) येथे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, सरपंच कांता येलमर, प्रशांत जाधव, शैलेंद्र येलमर यांच्यासह सर्व विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जमदाडे यांनी कान्हरवाडी गावातील आजवरच्या एकूण बाधितांची संख्या, सध्या बाधित असलेल्या लोकांची संख्या, लसीकरण, तपासण्या याबाबत माहिती घेतली. गावातील बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या तपासण्या तातडीने करून घ्याव्यात, तसेच लसीकरणाबाबतही समाधानकारक आकडे नसल्याने त्याबाबत लोकांच्यात जनजागृती करून ग्राम दक्षता समिती, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत यांनी लसीकरणाचा आकडा वाढण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
जमदाडे म्हणाले, ‘कान्हरवाडी गाव लहान असले तरी बाधितांची संख्या जास्त असून त्यातील मृतांचा आकडा हा विचार करायला लावणारा असल्याने लोकांनी घाबरून न जाता स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. बाधितांच्या संपर्कातील लोक तपासण्या करण्यास तयार होत नसतील तर त्याबाबत प्रशासनाला कळवा, आम्ही त्यासाठी खंबीर असून अशा लोकांच्यावर कारवाई केली जाईल,’ असा इशारा तहसीलदारांनी दिला.
मालोजीराव देशमुख म्हणाले, ‘लोकांनी काळजी घेणे गरजेचे असून विनाकारण बाहेर पडू नये. तुमच्यावर कारवाई करताना आम्हाला आनंद होत नाही, परंतु सर्वांच्या आरोग्यासाठी पोलीस कारवाई करत आहेत. अशा कारवाया टाळणे लोकांच्या हातात असून लोकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.’
यावेळी प्रशांत जाधव, शैलेंद्र वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य, दीपाली येलमर, मोहन तुपे, अरुण चव्हाण, रविशास्त्री जाधव, माधुरी देवकर, चंद्रकांत येलमर, माजी सरपंच अमोल येलमर, पोलीस पाटील अजय येलमर यांच्यासह दक्षता कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.