वाठार स्टेशन येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील हनुमान मंदिराच्या तसेच प्रमुख मंदिरांच्या बाहेर घंटा वाजवून घंटानाद व थाळीनाद आंदोलन केले.
पिंपोडे बुद्रुक : वाठार स्टेशन येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील हनुमान मंदिराच्या तसेच प्रमुख मंदिरांच्या बाहेर घंटा वाजवून घंटानाद व थाळीनाद आंदोलन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होऊ नये, याकरिता राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व मंदिरे, मशिदी, देवालय, धार्मिक स्थळे आदी बंद ठेवली होती. केंद्र शासनाने सदरची धार्मिक स्थळे उघडली जातील, असे राज्य शासनाला सूचित केले होते. परंतु, गणेशोत्सव तसेच मोहरम असे सण असल्याने होणारी गर्दी लक्षात घेत आणखी काही दिवस ही बंधने कायम राहणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यामध्ये सर्वच प्रमुख मंदिरांच्या बाहेर थाळीनाद करून सरकारला जाग आणण्यासाठी तसेच भाविकांच्या भक्तिमार्गाला न्याय मिळवण्यासाठी भाजपाच्यावतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्त मंदिर बंद असल्यामुळे लोकांच्यातून मंदिरे उघडा या मागणीचा फार मोठा जनरेटा वाढला असून, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी जनतेचा आवाज बनून आज दि. 29 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच प्रत्येक गावागावांत देऊळ उघडा आंदोलन केले आहे.
येथील देऊळ उघडा आंदोलनांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष मनोज कलापट, सचिन जाधव, राजेश काळोखे, मंगेश शितोळे, धर्मेंद्र निंबाळकर, ज्ञानेश्वर लोंढे, संजय गायकवाड, यशवंत पवार, हनमंत मांडवे, ज्ञानेश्वर चव्हाण, नवल जाधव, अभिजित जाधव, जितेंद्र रावळ, दत्ता भंडलकर, आदी ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.