सैदापुरातील 'त्या' तीन मुलींच्या मृत्यूचे अहवाल दोन महिन्यांनी पोलिसांना प्राप्त
Published:Feb 14, 2021 02:55 AM | Updated:Feb 14, 2021 03:14 AM
News By : Muktagiri Web Team
कराड : सैदापूर ता. कराड येथील एकाच कुटूंबातील तीन मुलीचा डिसेंबर महिन्यात मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तिनही मुलींच्या उलटीचे व व्हिसेराचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. दोन महिन्यानंतर पुणे व मिरज येथून अहवाल कराड पोलिसांना प्राप्त झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वरूटे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान अहवाल आले असले तरी त्या अनुषंगाने कराड पोलीस शासकीय वैद्यकीय तज्ञांशी संवाद साधून तपासाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे समजते. सैदापूर (ता. कराड) येथील तीन सख्ख्या बहिणींचा डिसेंबर २०२० मधे संंशयास्पद मृत्यू झाला होता. संबंधित मुलींच्या आईसह त्या तिघींना जेवणानंतर उलट्या झाल्या. रुग्णालयात उपचार सुरू असताना एकापाठोपाठ तीन मुलींचा मृत्यू झाला होता. आयुषी सासवे (वय 3), आरूषी सासवे (वय 8), आस्था शिवानंद सासवे (वय 9) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. दरम्यान या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक राहूल वरूटे यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला. तीन मुलींचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. मुलींच्या उलट्यांचे नमुनोही तपासणीला पाठवले होते. तब्बल दोन महिन्यांनी त्याचा अहवाल कराड पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालावर पोलीस वैद्यकीय तज्ञांशी चर्चा करत आहेत. पोलिसांनी हा अहवाल अत्यंत गोपनीय ठेवला आहे. या अहवालात नेमके काय आहे याकडे सर्वांच्या नजरा आहेत.