कराड विमानतळाच्या विस्ताराबाबत येत्या तीन महिन्यात उच्च स्तरीय मिटिंग घेतली जाणार
News By : कराड | संदीप चेणगे
कराड: महाराष्ट्रातील तालुका ठिकाणचं पहिलं विमानतळ कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलं होतं कारण कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी तेथील ग्रामस्थांचा विरोध नसून त्याबाबत योग्य तो निधी त्यांना हवा आहे यासाठी राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची अपेक्षा आहे या माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय मिटिंग घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे, या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले तालुका पातळीवरील विमानतळ स्व. यशवंतराव चव्हाण यांनी उभारले होते. माझ्या मुख्यमंत्री काळात कराड विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर निधीअभावी प्रलंबित असणारा तो प्रश्न लवकर मार्गी लागावा यासाठी पाठपुरावा केला जात आहे. तसेच 28 नोव्हेंबर 2022 ला MADC च्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला होता की, महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये हेलिपॅड करण्याचा. विमानतळ बाबत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी इच्छा असूनही अडचणी येत आहेत. त्या नाईट लँडिंगच्या असतील किंवा विमानतळ विस्तारीकरणाबाबत असतील. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये हेलिपॅड करण्यासाठी जागा निश्चितीचे आदेश दिलेले आहेत. हे जर खरे असेल तर शासनाने याबाबत काही धोरण ठरवलेले आहे का? असा राज्याच्या दृष्टीने महत्वाचा तसेच मतदारसंघातील कराड विमानतळाचा अत्यंत महत्वाचे प्रश्न विधानसभेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला विचारले. आ. चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या विमानतळाबाबत जो प्रश्न मांडलेला आहे त्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय मिटिंग आपण येत्या तीन महिन्यात घेतली जाईल. कराड विमानतळ विस्तारीकरणाबाबत जर शेतकऱ्यांच्या काही अडचणी नसतील तर निधीची कोणतीही कमी होणार नाही. कराडचे विमानतळ हे अत्यंत महत्त्वाचं व स्ट्रेटेजिक विमानतळ आहे त्यामुळे जर त्याचा विस्तार करता आला तर त्याचा नक्कीच त्या भागातील लोकांना फायदा होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील विमानतळांचा विचार केला तर कराड सारख्या ठिकाणी एक मध्यवर्ती विमानतळ असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण मागच्या वेळी आपण बघितलं की मोठा पूर त्या भागात आला त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये विमानतळच आसपास नसल्याने कनेक्टिव्हिटी त्या भागात होत नव्हती. कोल्हापूर विमानतळावर उतरता येत नव्हतं कारण तिथं पाण्याचा वेढा होता, त्यामुळे त्याचा सुद्धा विचार आपल्याला करण गरजेच आहे. यामुळे यासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक आपण घेऊ. आपल्याकडे विमान संचालनालय आणि नागरी विमानन विभाग देखील आहे. काही विमानतळ MADC च्या अंतर्गत ठेवले आहेत तर काही MIDC च्या अंतर्गत ठेवले आहेत त्यामुळे या सर्वांना एका नोडल एजेन्सी च्या अंतर्गत आपणाला आणावे लागेल तशी एक नोडल एजेन्सी आपण तयार करू आणि पुढच्या तीन महिन्यात याचा एक प्लॅन आपण तयार करू. तसेच आ. चव्हाण यांचा राज्यातील प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्याबाबतचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि धोरणात्मक असा प्रश्न आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये हेलीपोर्ट करण्याबाबत एक समिती करण्यात आलेली आहे. नुकतीच या समितीची एक मीटिंग झालेली असून त्याचे नोटिफिकेशन येणे बाकी आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये हेलिपॅड साठी ज्या जागा निश्चित केल्या आहेत त्या जागा प्रत्यक्ष पाहणी करून टेक्निकली योग्य आहेत का हे तपासून बघितले जातील. ----------------------------------------------------------