दोन अल्पवयीन शाळकरी मुलींनी चारचाकी वाहनाला हात लावल्याच्या संशयावरून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची फिर्याद शनिवारी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गणेश हंबीरराव साळुंखे, त्याची आई उषा हंबीरराव साळुंखे व बहीण (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्याविरोधात अट्रोसिटीसह अन्य कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. गणेश साळुंखे हा येथील विकास सेवा सोसायटी नं.२ चा व्हाईस चेअरमन आहे.
नागठाणे : दोन अल्पवयीन शाळकरी मुलींनी चारचाकी वाहनाला हात लावल्याच्या संशयावरून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची फिर्याद शनिवारी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गणेश हंबीरराव साळुंखे, त्याची आई उषा हंबीरराव साळुंखे व बहीण (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्याविरोधात अट्रोसिटीसह अन्य कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. गणेश साळुंखे हा येथील विकास सेवा सोसायटी नं.२ चा व्हाईस चेअरमन असून या घटनेने नागठाणे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी नागठाणे येथील मागासवर्गीय समाजाच्या दोन शाळकरी बहिणी शाळेतून घरी निघाल्या होत्या. त्या गणेश साळुंखे याच्या घरासमोरून जात असताना बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या चारचाकी वाहनाला या मुलींनी हात लावला. या संशयावरून त्याने या दोन्ही मुलींना हाताला धरून ओढत नेऊन जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली.
या घटनेची माहिती मुलींनी आईला दिल्यावर त्या मुलींना घेऊन जाब विचारण्यासाठी गेल्या असता गणेश साळुंखे याची बहीण (पूर्ण नाव समजू शकले नाही) व आई उषा हंबीरराव साळुंखे यांनीही त्यांना जातीवाचक बोलून अपमानित केले. याची माहिती त्यांनी कुटुंबियांना सांगितल्यावर शनिवारी संबंधितांनी बोरगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दल दलित विकास आघाडीचे शहर प्रमुख अभिजित सकटे, ऋषिकेश जाधव, सुयोग जाधव, भीमशक्तीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजरतन कांबळे, राजे प्रतिष्ठानचे मातंग समाज जिल्हा अध्यक्ष संजय मोहिते उपस्थित होते.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट देऊन माहिती घेतली असून पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नाही.या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल करत आहेत.