शामराव पाटील पतसंस्थेत अँड. उदयसिंह पाटील यांची एकहाती सत्ता : विरोधकांना झिरो
News By : कराड | संदीप चेणगे
कराड - उंडाळे येथील स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत रयत साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते विलासकाका पाटील रयत पॅनलने विरोधी चुलते जयसिंगराव पाटील व चुलत बंधू आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील यांच्या शामराव पाटील सहकार पॅनेलचा सर्वच्या सर्व जागावर दारुण पराभव करत सत्ता घेतली. स्वा. सै. शामराव पाटील नागरिक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक तब्बल 42 वर्षानंतर प्रथमच लागली होती. युवा नेते उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते विलासकाका पाटील रयत पॅनल उभे करण्यात आले होते. तर विरोधी जयसिंगराव पाटील व चुलत बंधू राजाभाऊ पाटील यांनी शामराव पाटील सहकार पॅनल निवडणूकीत होते.
शनिवारी अत्यंत चूरशीने मतदान होऊन 8900 पैकी 6140 मतदान झाले होते. आज उंडाळे येथील स्वा. दादा उंडाळकर स्मारक मंदिर येथे मतमोजणी पार पडली. यामध्ये जयसिंगराव पाटील व राजाभाऊ पाटील यांच्या पॅनलला अवघी 1300 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक संदीप जाधव यांनी काम पाहिले.