वन्य पशू-पक्षी पाळणे, हाताळणे, विक्री करणे, त्यांची शिकार करणे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये कायद्याने गुन्हा आहे. वन्य पशू-पक्षी यांना हाणी पोहोचवणार्यांबद्दल माहिती मिळताच तात्काळ 1926 (हेलो फारेस्ट) या टोल फ्री क्रमांकावर तसेच जवळच्या वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून करण्यात आले आहे.
कराड : अखिल भारतीय व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेर्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथील गाभा क्षेत्रात शिकार करण्याच्या हेतून विनापरवाना शस्त्रास्त्रासह घुसलेल्या तीन संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
संदीप तुकाराम पवार (वय 37, रा. हातीव पुनर्वसन), मंगेश जनार्दन कामतेकर (वय 33) आणि अक्षय सुनिल कामतेकर (वय 19, रा. मारल) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी, अखिल भारतीय व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथील गाभा क्षेत्रात शिकार करण्याच्या हेतून विनापरवाना शस्त्रास्त्रासह घुसल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने आंबा घाटातून व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम दिशेला उतारावरील आसपासच्या गावात जाऊन चौकशी करण्यास सुरू केली. खबर्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 1 एप्रिल रोजी हातिव (गोठणे पुनर्वसित) गावात जाऊन चौकशी केली. वन्यजीव विभागाचे तपास पथक पोहचताच तेथे संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्या ठिकाणी कसून चौकशी केली असता एक संशयीत आरोपी आढळून आला. त्याला चौकशीसठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्याने व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विनापरवाना शिकारीच्या उद्देशाने अपप्रवेश केल्याचे मान्य केले. दिनांक 2 एप्रिलला चौकशीत सदर प्रकरणात अजून दोन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चौकशीअंती मारळ ता. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. वरील तीनही आरोपींनी वनविभागाच्या हद्दीत शस्त्रास्त्रासह शिकारीसाठी गेल्याने कॅमेर्यात आल्याचे कबूल करून केलेला गुन्हा मान्य केला. त्यानुसार वरील आरोपींना वन्यजीव कायदा 1972 अन्वये अटक करून त्यांची देवरुख येथे वैद्यकीय चाचणी केली. व रत्नागिरीच्या न्यायदंडाधिकारी यांच्याकडे पेश करण्यात आल्यानुसार आरोपींना 7 एप्रिल पर्यंत म्हणजेच 5 दिवसाची वनकोठडी (फारेस्ट कस्टडी) सुनावली. सदर गुन्ह्यात अजून आरोपी असण्याची शक्यता, गुन्ह्यात वापरलेली शस्त्र जप्त करणे, वन्यप्राण्याच्या शिकारीची शक्यता या शक्यतांमुळे आरोपींना जामिन मिळू शकला नाही. सदर आरोपींकडून हस्तगत केलेल्या मोबाईलमध्ये संशयास्पद छायाचित्रे आढळून आल्याने अधिकचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सदरची कारवाई सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत तसेच विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या तपास पथकातील सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे, चांदोली वन्यजीवचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, फिरते पथकचे शिशुपाल पवार वनपाल गारदी, वनरक्षक दणाने वाहनचालक सर्वश्री सचिन, अनंत, सागर तसेच वन्यजीव प्रेमी प्रतिक मोरे यांनी केली. तसेच रत्नागिरी वन विभागाचे विभागीय वनाधिकारी दिपक खाडे, वनक्षेत्रपाल श्रीमती प्रियंका लगड, वनपाल देवरुख मुल्ला, वनरक्षक गावडे व त्यांचे अधिनस्त कर्मचारी, तसेच पंचक्रोषीतले पोलिस पाटील, सरपंच यांची मदत लाभली.
????????