राऊतवाडी, ता. कोरेगाव येथील ग्रामस्थांनी स्वतःच व्यक्तीरेखा साकारून शॉर्टफिल्मच्या माध्यमातून कोरोनावर मात करून आलेल्या तरुणाकडे पाहण्याचा सामाजाचा दृष्टिकोन यावर भाष्य करणारा काल्पनिक परंतु वास्तविक ‘भ्रम’ नावाचा लघु-चित्रपट तयार केला आहे. त्यांच्या प्रबोधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रणजित लेंभे
पिंपोडे बुद्रुक : राऊतवाडी, ता. कोरेगाव येथील ग्रामस्थांनी स्वतःच व्यक्तीरेखा साकारून शॉर्टफिल्मच्या माध्यमातून कोरोनावर मात करून आलेल्या तरुणाकडे पाहण्याचा सामाजाचा दृष्टिकोन यावर भाष्य करणारा काल्पनिक परंतु वास्तविक ‘भ्रम’ नावाचा लघु-चित्रपट तयार केला आहे. त्यांच्या प्रबोधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरेगाव तालुक्यातील राऊतवाडी हे अडीचशे उंबर्यांचं छोटेसे गाव. कोरोना या महामारी संकटाने सर्वच लोकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. याचबरोबर कोरोना संसर्गाची ज्या पद्धतीने काळजी घेण्याची आवश्यकता आहे, त्याऐवजी लोकं ज्यांना कोरोना झाला त्यांना हीन वागणूक देत आहेत. राज्यातील मागील दोन ते तीन महिन्यांत मुंबई-पुणे शहरात कोरोनाचे हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढू लागले आणि दररोज यातून हजारोंच्या संख्येने बरे सुद्धा झाले. त्याच दरम्यान महामारीच्या संकटातून काहीजण आपल्या गावाकडे येऊ लागले. मात्र, गावाकडे सुरक्षित असणार्या लोकांना आपलीच शहरातील माणसं या आजाराने नकोशी वाटू लागली आहेत.
अनेक जण आजही मुंबई-पुण्याहून जवळची माणसं आली तर लगेच काहीही कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न केल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये युवकाला कोरोना होऊन तो बराही झालेला असतो. मात्र, त्याचे मित्र त्याला जवळ करीत नाही, त्याला टाळण्याचा व लांब ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे तो अशा वागण्याला वैतागलेला व निराश झालेला असतो, म्हणून त्याचे वडील त्याला गावी असणार्या भावाकडे पाठवतात. परंतु, या ठिकाणीही गावी चौदा दिवस होम क्वारंटाईन (विलगीकरण) होऊन सुद्धा आपल्या गावाकडची माणसं, मित्र, सगेसोयरे कोरोनाच्या संसर्ग माहिती विषयी अज्ञानपणामुळे जवळ करत नाहीत. मूळ आजाराविषयी व्यवस्थित माहिती व काळजी घेण्याऐवजी त्यावेळेस माणुसकी हरपली की काय? गावाकडे येऊन सुद्धा निराशा होते.
माणसातील समज, गैरसमज व भ्रम या आशयावर आधारित व समाजातील व्यवस्थेवर प्रकाश टाकणारी शॉर्टफिल्म राऊतवाडी ग्रामस्थांनी बनवली आहे. विशेष म्हणजे या फिल्ममधील सर्व व्यक्तिरेखा गावातील लोकांनी केल्या आहेत. बहुतांशी पात्रही त्याच क्षेत्रातीलच आहेत. तसेच कुठेही अद्ययावत कॅमेरा नाही, नवीन टेक्नॉलॉजी व तंत्र नाही. सर्व चित्रिकरण गावातच, दिग्दर्शन, कथा, कलाकार सर्व काही गावकर्यांचेच. साधी स्टोरी मात्र विषयाला प्रबोधन आणि कलेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी सशक्त उंची दिली आहे. सध्या ही शॉर्टफिल्म सोशल मीडियावर भागात चर्चेचा विषय झाली असून, शहरातील आपल्याच नातेवाइकांची वास्तव वेदना न बोलता प्रत्येकाशी जोडली व मांडल्याची असल्याची भावना व प्रतिक्रिया फिल्म पाहणार्या प्रत्येकाच्या चेहर्यावर उमटत होती.
लेखक नवनाथ पुजारी, दिग्दर्शन वैभव पुजारी, चित्रिकरण उदय पुजारी, भूषण शेलार, अविनाश सावंत, प्रताप नावडकर, रघुनाथ कदम, मोहन कदम, प्रदीप अहिरेकर आदी कलाकार यांनी सादरीकरण केले आहे. दरवर्षी हे गाव ग्रामदैवतेच्या यात्रेनिमित्त गावपातळीवर नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन करते. आतापर्यंत नव्याण्णव वेगवेगळ्यांवर विषयांवर प्रयोग केले आहेत. विशेषतः आजही गावकरी यात हिरिरीने भाग घेत आहेत.
या लिंकवर ‘भ्रम’ शॉर्टफिल्म पाहता येईल : https://www.youtube.com/watch?v=imCcwvq_jKg&feature=youtu.be