सातारा जिल्ह्यात दोन आमदार व दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या खटाव तालुकाध्यक्ष पदी येरळवाडीतील रहिवासी व पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण यांची निवड करण्यात आली.
वडूज : सातारा जिल्ह्यात दोन आमदार व दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या खटाव तालुकाध्यक्ष पदी येरळवाडीतील रहिवासी व पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण यांची निवड करण्यात आली.
गेल्या डिसेंबर महिन्यात 16 मंडलांपैकी 10 मंडल अध्यक्ष निवडी झाल्या. कोरोना संकटाने राहिलेल्या 6 पैकी 4 मंडल अध्यक्ष यांची निवड जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दि. 10 ऑगस्ट रोजी जाहीर केली होती. उर्वरित 2 मंडल अध्यक्षपदी खटाव तालुकाध्यक्षपदी येरळवाडी येथील धनंजय चव्हाण यांची तर माण तालुक्यातील म्हसवड येथील शिवाजीराव शिंदे यांची माण तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जुन्या पदाधिकार्यांची मुदत संपली आहे. परंतु, जुन्या पदाधिकार्यांनी पक्ष कार्यात कार्यरत राहून आपल्या अनुभवाचा फायदा नवीन पदाधिकार्यांना करून द्यावा आणि पक्ष संघटन वाढवण्यास मदत करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केले आहे.
भाजप पक्ष वाढीसाठी अनुभवी दोन नेत्यांची निवड झाल्याने माण-खटाव तालुक्यात भाजपामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. सर्वांना सोबत घेऊन अध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे पार पाडण्यात येईल, असा विश्वास नूतन खटाव तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण यांनी व्यक्त केला.
नूतन पदाधिकार्यांच्या निवडीबद्दल त्यांचे प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी अभिनंदन केले.