टोपी पाहिली की लगेच सही : सदाशिव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते , माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाले, आजच्या कार्यक्रमाला आमदार ( अनिल बाबर )आहेत. त्यामुळे अधिक बोलणं योग्य नाही. तरीही आठवणं सांगतो. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी आमदार होतो. त्याचं नेतृत्व मानून आम्ही मतदारसंघात काम केले. अनेक विकासकामे केली. ज्या - ज्यावेळेस पत्र घेऊन जायचो. तेव्हा ते फक्त टोपी पाहिली की संबंधित पत्रावर मंजूर म्हणून सही करी
विटा, : सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र माजी मंत्री , आमदार अमित देशमुख यांना भाजप मध्ये प्रवेश करण्याची आॅफर दिली. मात्र राजकारणात कसलेल्या लातूरच्या अमित देशमुखांनी आॅफर नम्रपणे नाकारली. खासदार संजय पाटील यांना तुमची मूळ विचारधारा असणाऱ्या पक्षात ( काॅग्रेस ) येण्याचे आवाहन केले. मराठवाड्यातील कसलेल्या राजकारण्याची झलक विटेकरांनी अनुभवली. देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. कितीही संकटं आणि वादळं आली तरी लातूरचा देशमुख वाडा आहे तिथेच राहणार’, ही संस्काराची श्रीमंती विलासराव देशमुखांनी आम्हाला दिली आहे. त्यामुळे तुम्हीच स्वगृही यावे, असं मी म्हणालो, तर ते अधिक संयुक्तीक ठरेल, असे म्हणत भाजप प्रवेशाची ही जाहीर ऑफर माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नम्रपणे नाकारली. येथील सेंद्रीय शेतीचे अभ्यासक जयंत तथा बाबा बर्वे यांचा कृतज्ञता सोहळा आणि नेचर केअर फर्टिलायझर्स कंपनीच्या २५ व्या वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सांगली खासदार पाटील यांनी जाहीरपणे अमित देशमुख यांना भाजपमध्ये येण्याचे ऑफर दिली. तितक्यास नम्रपणे आमदार अमित देशमुख यांनी ही ऑफर जाहीरपणे नाकारत त्यांनाच काँग्रेसमध्ये येण्याची विनंती केली. यावेळी बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले, मला तुमच्या घरी या म्हणताय, परंतु तुम्हीच सगळे मिळून माझ्या घरी यावं. असं जर मी म्हणलो तर तेच अधिक संयुक्त ठरेल,असा मला विश्वास आहे आणि त्याची सुरुवात इथून विट्याच्या बर्वे वाड्यातून व्हावी. खासदार पाटील यांनी जरी मला निमंत्रण दिले असले तरी या व्यासपीठावर मी राजकीय बोलणार नाही. हा घरगुती कार्यक्रम आहे, असे म्हणत आम्ही भिन्न विचाराचे नाही. आमचे विचार एकच आहेत. या दुष्काळी भागाचा या विट्याचा सर्वांगीण विकास झाला, तो काय फक्त गेल्या पाच वर्षात झालेला नाही. हे जाहीरपणे जरी तुम्ही मान्य करीत नसला तरी खासगीत नक्कीच मान्य करता, असेही ते म्हणाले. सुरूवातीला बोलताना खासदार संजय पाटील यांनी आज दिवसभर माजी मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांची आमदार अमित देशमुख यांच्या बाबतीतली भाजप प्रवेशा बाबतची चर्चा सुरू आहे. आता तुम्ही आमच्या जिल्ह्यात आला आहात. सांगली जिल्हा आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा विशेष जिव्हाळा राहिला आहे. बर्वे यांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आला आहात. आम्हाला आश्चर्य वाटते की, विलासराव देशमुख आणि बाबा बर्वे हे अगदी भिन्न विचाराचे असून त्यांच्यात मैत्री कशी झाली? त्यांच्या बर्वे वाड्यात गेली ३० वर्षे संघाची शाखा चालत आहे आणि तुमचे घराणे काँग्रेसचे व मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे या घरच्या कार्यक्रमात मी तुम्हाला आमच्याकडे येण्याचे निमंत्रण देतो, तुम्ही आल्याने तुमचे राज्य भरात असणारे विलासराव देशमुख प्रेमी मंडळी भाजपकडे येतील, अशा शब्दात खासदार संजय पाटील यांनी आमदार अमित देशमुख यांना भाजप प्रवेशाचे आमंत्रण जाहीर दिले. आमदार देशमुख म्हणाले, ही पाच वर्षे चमत्कारीक आहेत. पाच वर्षातील हे तिसरे सरकार आहे. पहिले अडीच दिवसाचे, दुसरे अडीच वर्षाचे आणि सध्याचे तिसरे सरकार आहे. पण चौथे कधी येईल, काही सांगता येत नाही. निवडणुका तर होतच नाहीत. विट्यातही प्रशासक आहे. मात्र या परिस्थितीतही सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आमदार- खासदार, लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायला पाहिजेत, असेही माजी मंत्री आमदार देशमुख म्हणाले. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचे काम आमच्या महाविकास आघाडी सरकारने सुरू केले होते. परंतु, आताचे जे सरकार आले आहे असे म्हणत आमदार अमित देशमुख यांनी आमदार बाबर यांच्याकडे कटाक्ष टाकत तुम्ही या सरकारचे नाव काय ठेवले आहे ? असा प्रश्न केला. त्यावर आमदार बाबर उत्तरले “भाजप सेना !” त्यावर लगेच त्यांनी शिवसेना शिंदे गट – भाजप असे तूर्त तरी म्हणावे लागेल. कारण मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे टिप्पणी करत शेवटी हे सगळे सर्वोच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे शांतता राखा कोर्ट सुरू होणार आहे, असा टोलाही आमदार देशमुख यांनी लगावला.