मंत्री शंभूराज देसाई ॲक्शन मोडवर ः पाटणची पाणी टंचाई दूर करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध
Published:Oct 03, 2023 10:13 PM | Updated:Oct 03, 2023 10:13 PM
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
पाटण ः पाटण शहराला गेली अनेक दिवसांपासून पाणी टंचाईची भीषण समस्या भासत होती. याची दखल घेत मंत्री शंभूराज देसाई ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी शहराची पाणी टंचाई दूर करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध केला आहे. यामुळे नागरिकांची पाण्यासाठीची होणारी भटकंती थांबणार असल्याने नागरिकांतून मंत्री देसाई यांना अभिनंदन होत आहे. पाटण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा पंप नादुरूस्त असल्याने गेली अनेक दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत होते. कोयना धरण उशाला असतानाही नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने या पाणी टंचाईबाबत समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. याची दखल घेत मंत्री शंभूराज देसाई यांनी नगर विकास विभागाकडून पाटण नगरपंचायतला साठवण टाकीसह जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेंतर्गत या योजनेचे काम सुरू आहे. निधी मंजूर झाल्यामुळे मंत्री देसाई यांचे नागरिकांतून अभिनंदन होत आहे.