मलकापूर पालिकेचे नगरअभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात
बिल मंजुरीसाठी तीस हजार रूपये घेताना कारवाई
Published:Jul 10, 2023 09:54 PM | Updated:Jul 10, 2023 09:58 PM
News By : Muktagiri Web Team
कराड ः केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी ठेकेदारांकडून 30 हजार रुपयांची लाच घेताना मलकापूर पालिकेचे नगरअभियंता शशिकांत पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सायंकाळी उशिरा रंगेहात पकडले. त्याच्यासोबत संदिप एटावे यालाही अटक झाली आहे, अशी माहिती पोलिस उपाधिक्षक उज्ज्वल वैद्य यांनी दिली. पोलिसांची माहिती अशी ः शशिकांत पवार मलकापूर पालिकेत नगरअभियंता आहेत. त्यांच्याकडे कऱ्हाड पालिकेचाही अतिरिक्त चार्ज आहे. कऱ्हाड शहरामध्ये एका ठेकेदाराने काही कामे केली होती. त्या कामांच्या बिलाच्या रकमेचा धनादेश काढून द्यावा अशी मागणी संबंधिताने श्री. पवार याच्याकडे केली होती. बऱ्याच दिवसांपासून त्या रकमेचा धनादेश देण्यास तसेच ते बिल मंजूर त्याने टाळाटाळ केली होती. ती रक्कम मंजूर करण्यासाठी 42 हजार रुपयांची मागणी संबंधित ठेकेदारांकडे केली होती. तडजोडी अंती 30 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार संबंधित तक्रारदार ठेकेदार यांनी त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस उपाधिक्षक श्रीमती उज्ज्वल वैद्य यांच्याकडे तक्रार केली. तक्रारदाराने दिलेल्या माहितीची खात्री केल्यानंतर आज सायंकाळी सातच्या सुमारास मलकापूर पालिकेत सापळा रचण्यात आला. त्यावेळी तक्रारदार ठेकेदारांकडून 30 हजार रुपयांची लाच घेताना पवार व त्याचा खासगी सहकारी एटावे याना लाचलुचपत खात्याने रंगेहात पकडले. सापळा रचल्याचे लक्षात आल्यानंतर पवार याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पाठलाग करून पकडले.