समृद्ध अधिवासाचे प्रतीक शेतकऱ्यांचा मित्र आणि निसर्ग साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या नागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सातारा शहरातील महिलांनी मंगळवारी नागपंचमी उत्साहात साजरी केली.
सातारा : समृद्ध अधिवासाचे प्रतीक शेतकऱ्यांचा मित्र आणि निसर्ग साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या नागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सातारा शहरातील महिलांनी मंगळवारी नागपंचमी उत्साहात साजरी केली.
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार नाग पूजनाला बंदी असल्याने महिलांनी नागाच्या प्रतिमेच्या पूजनावर भर दिला. नागपंचमी हा श्रावणातील महत्त्वाचा सण या दिवशी श्री शंकर आणि नागाचे पूजन करून पुरणाचे दिंड करण्याची प्रथा आहे
मंगळवारी नागपंचमी आल्याने महिलांनी घरातच नागाच्या प्रतिमेची तर काही महिलांनी रानात जाऊन वारुळाचे पूजन केले. काही वर्षांपूर्वीपर्यंत नागपंचमीच्या दिवशी गारुडी सकाळी नागाला पिठाला घेऊन गल्लोगल्ली फिरायचे. नागरिक याच नागाला दूध द्याचा नैवेद्य दाखवायचे मात्र वन्य जीव संवर्धन कायद्यानुसार नाग बाळगण्यास तसेच जिवंत नाग पूजनावर बंदी आली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून बाजारपेठेत नागाच्या आखीव रेखीव मूर्ती उपलब्ध झाल्या आहेत. यंदाही सातारा शहरात महिलांनी नाग प्रतिमांची खरेदी करून घरोघरीच नागाचे पूजन केले आणि सणानिमित्त पुरणाचे दिंड करून नागराजाला नैवेद्य दाखवण्यात आला.
सातारा शहरातील रामाचा गोट परिसरातील नागाच्या पराजवळ सुवासिनींची पूजेसाठी मोठी गर्दी झाली होती. येथील नागाचा पार हे मंदिर पुरातन असल्याने येथे नागाचा अधिवास असल्याचे नागरिकांची श्रद्धा आहे पुरणाचे दिंड वाहण्यासाठी सुवासिनींनी मंदिरा बाहेर रांगा लावल्या होत्या. यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने नागपंचमीमध्ये रंगणाऱ्या पारंपारिक झिम्मा आणि फुगड्या तसेच झोक्याचा आनंदसुद्धा सुवासिनींनी लुटला.