गुन्हेगार्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष देणार
News By : Muktagiri Web Team
कराड शहर व तालुक्यातील गुन्हेगारी घटना आटोक्यात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले आहेत. अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापुढे प्रस्थापित गुन्हेगारी टोळ्यांवर विषेश लक्ष देण्यात येणार आहे. गुन्हेगारांच्या टोळ्यांना चाप लावण्यासाठी त्यांना अर्थ पुरवठा करणार्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितले. कराडच्या डीवायएसपी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुरूवारी ते पत्रकारांशी बोलत होते. डीवायएसपी बी. आर. पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पुजारी उपस्थित होते. यावेळी अमोल ठाकूर यांनी कराड शहर व तालुक्यातील गुन्हेगारी व लोकांना येणार्या अडचणींबाबतची माहिती पत्रकारांकडून जाणून घेतली. अमोल ठाकुर म्हणाले, गडचिरोलीतील सेवाकाळ पुर्ण झाल्यानंतर कराडला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. विद्यानगरमुळे कराडला शिक्षणचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी कराडला येतात. विषेशत: अशा विद्यार्थांसाठी मोठया प्रमाणात काम करण्याची इच्छा आहे. उंच भरारी अभियानांतर्गत पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कराडला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व लायब्ररी सुरू करण्याचा मानस आहे. तसेच वाट चुकलेल्या युवकांचे मार्गदर्शन करून त्यांना पुन्हा मुळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कराडत मोटरसायकल व मोबाईल चोरीच्या घटना मोठ्याप्रमाणात घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी खास पथक तयार करण्यात आले आहे. तसेच जुने मोबाईल विकत घेणार्यांवरही नजर ठेवण्यात येत आहे. अशा दुकानदारांना सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्यास सांगितले आहेत. चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कराडला स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. शहर व परीसरातील मुख्य रस्ते व चौकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वयीत आहे. मात्र प्रमुख्याने गुन्हेगारांच्या हलचाली चालणार्या ब्लॅक स्पॉटवर छुपे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच अनेक गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वापर व सहभाग समोर येत आहे. अशा मुलांच्या हलचालींवर पोलिसांनी विषेश लक्ष केंद्रीत केले आहे. शहरातील वाहतुक व्यवस्था व कोल्हापुर नाका ते कृष्णा हॉस्पिटल दरम्यान बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलामुळे वाहतुकीवर ताण येत आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांची संख्या वाढवण्याबाबत जिल्हा पोलिस प्रमुखांकडे मागणी करण्यात आली आहे. लवकरच कराडच्या वाहतुक शाखेला जादा पोलिस कर्मचारी उपलब्ध होतील. तसेच बसस्थानक परिसर व कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा चौकातील वाहतुक व्यवस्थेचे नियोजन करून हा परिसर मोकळा श्वास घेईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.