गौरी-गणपती सणानिमित्त घरी येणार्या महिलांना हळदी-कुंकवाचा मान सन्मान करण्याबरोबरच त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक आरोग्य साहित्य वाटप करण्याचा उपक्रम वाकेश्वर, ता. खटाव येथील नवशक्ती महिला बचत गटाच्या माध्यमातून राबवण्यात आला.
वडूज : गौरी-गणपती सणानिमित्त घरी येणार्या महिलांना हळदी-कुंकवाचा मान सन्मान करण्याबरोबरच त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक आरोग्य साहित्य वाटप करण्याचा उपक्रम वाकेश्वर, ता. खटाव येथील नवशक्ती महिला बचत गटाच्या माध्यमातून राबवण्यात आला.
वडूज येथील ब्रह्मचैतन्य आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका धनंजय क्षीरसागर या बचत गटाच्या संस्थापक सचिव आहेत. त्यांनी यावर्षी आपल्या घरगुती गणेशोत्सवासमोर आकर्षक देखावा तयार केला आहे.
या देखाव्यात ऑनलाईन शिक्षण पद्धतीने मोबाईल, टॅबद्वारे शिक्षण घेणार्या गौरी, मास्क शिवणार्या गौरी, कोरोना जनजागृती करणारी गौरी असे देखावे सादर केले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी येणार्या प्रत्येक महिलेस मास्क व अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. मुंबई ‘मनपा’चे नगरसेवक व चांदवली विधानसभा मतदार संघ भाजपा अध्यक्ष हरीष भांदिर्गे यांच्या सहकार्यातून हे वाटप करण्यात आले.
दरम्यान, वडूज येथील बाजारपेठेतील निवृत्त भूमी अभिलेख अधिकारी अशोकराव गाढवे यांच्या राहत्या घरीही गणपती समोर शेषनागावर आरूढ विष्णू-लक्ष्मी हा देखावा तयार केला आहे. त्यांची नात अमृता गाढवे व सून रूपाली अजित गाढवे यांनी या देखाव्यासाठी परिश्रम घेतले.