संपूर्ण फलटण शहरासह रिंग रोडवरील अनेक अतिक्रमणे हटवून फलटण नगरपरिषदेने बराचसा श्वास मोकळा केला आहे. मात्र याचवेळी ज्वेलरीचे भलेमोठे शोरूमचे अतिक्रमण रिंगरोड वरील रस्त्यावर आल्याचे दिसत असून, याकडे नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा फलटणकर नागरिकांमधून होत आहे. या अतिक्रमणाला राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.
युवराज पवार
फलटण : संपूर्ण फलटण शहरासह रिंग रोडवरील अनेक अतिक्रमणे हटवून फलटण नगरपरिषदेने बराचसा श्वास मोकळा केला आहे. मात्र याचवेळी ज्वेलरीचे भलेमोठे शोरूमचे अतिक्रमण रिंगरोड वरील रस्त्यावर आल्याचे दिसत असून, याकडे नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा फलटणकर नागरिकांमधून होत आहे. या अतिक्रमणाला राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.
मागील काही दिवसांपूर्वी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी धडाकेबाज कारवाई करीत शहरातील अनेक अतिक्रमणे हटवली. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना सिंघम, मुंडे अशी पदवी बहाल केली. मात्र, ही अतिक्रमण हटाव मोहीम कोविडच्या पार्श्वभूमीवर थंडावली. मात्र, रिंगरोडचे अतिक्रमण हटवून फलटण शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी सत्ताधारी राजेगटाने व मुख्याधिकारी प्रसाद काटकर व इतर पालिका अधिकारी व कर्मचार्यांनी शहरासह गल्लीबोळातून अतिक्रमणे हटवली व रस्त्यांना मोकळा श्वास मिळवून दिला. यामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षांनी सुद्धा या कामाची दखल घेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मात्र, काही सत्ताधारी नगरसेवक (एकांतात) व विरोधी पक्षांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी फलटण नगरपरिषदेवर एक मोठा आरोप केला की, गरिबांची अतिक्रमणे काढली मात्र मोठ्यांची अतिक्रमणे काढली नाहीत.
दरम्यान, सध्या जुना पृथ्वी चौक व नवीन नामकरण झालेल्या अहिल्यादेवी होळकर चौकातील एका सोनेचांदी विकणार्या व्यापार्याने आपल्या इमारतीचा काही भाग अतिक्रमणात बांधला असल्याची चर्चा सुरू असून, प्रत्यक्ष तेथे गेल्यावर एसटी स्टॅण्ड कडून किंवा डी. एड. चौकातून येताना चौकाच्या मधोमध अतिक्रमण केलेली इमारत स्पष्टपणे दिसत आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाचे काही अधिकारी सांगत आहेत की, संपूर्ण रिंगरोडवरतीच बर्याच लोकांनी अतिक्रमण केले आहे. तर एका अधिकार्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, कजप पत्रक (कमी जास्त पत्रक) न केल्याने ही इमारत उभी केली आहे.
दरम्यान, अनेक गोरगरिबांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता धडाधड बुलडोझर लावून अतिक्रमणे काढीत त्यांच्या अन्नात माती कालवली, मग हा व्यापारी रिंगरोडमध्ये इमारत बांधतो व मुख्य चौकात अतिक्रमण करतो, तो कोणाच्या राजकीय वरदहस्ताने, अशी चर्चा सुरू असून या इमारतीवर बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी कारवाई करावी, अशी मागणी फलटणकर नागरिकांमधून होत आहे.
अतिक्रमाणामुळे होतायेत अपघात
आत्तापर्यंत रिंगरोडवर छोटे-मोठे अपघात होऊन तब्बल 30/35 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो लोक जायबंदी झाले आहेत. दरम्यान, या इमारतीच्या उंची व रुंदीमुळे अनेक लोक वाहन चालवताना फसत असून, पुढे मोठा अपघात घडला तर या अपघातास या इमारत मालकाला जबाबदार धरले जावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.