औंध, ता. खटाव येथील ज्योती गॅस एजन्सीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ साठे यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
वडूज : औंध, ता. खटाव येथील ज्योती गॅस एजन्सीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ साठे यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनातील अधिक माहिती अशी की, ज्योती गॅस एजन्सी ही ग्राहकांची खूप मोठी आर्थिक फसवणूक करत आहे. ग्राहकांना नवीन गॅस कनेक्शन तसेच गॅस सिलिंडर वितरण करताना ग्राहकाकडून अतिरिक्त पैसे घेत आहेत. प्रति गॅस सिलिंडर बुकिंग पावती रकमेपेक्षा 20 ते 30 रुपये जास्त घेत आहेत. अशा प्रकारे तालुक्यातील सर्व गोरगरीब कष्टकरी ग्राहकांची लूट करीत आहेत. तसेच दर सहा महिन्यांनी प्रत्येक ग्राहकाकडून 100 रुपये सर्व्हिस चार्जच्या नावे घेतले जात आहेत. सदर पैशाची कोणती पावती ग्राहकांना दिली जात नाही.
तरी ग्राहकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबवून त्या वितरकावर कठोर कारवाई करून, गॅस वितरण परवाना रद्द करून तालुक्यातील सर्व ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
त्याचबरोबर येत्या 15 दिवसांत कारवाई न झाल्यास केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ही निवेदनात दिला आहे.
या निवेदनावर आनंदा साठे, अजित साठे, नवनाथ साठे, शुभम भिनगोरे, अतुल करंडे यांच्या सह्या आहेत.