निसर्ग संवर्धनाच्या उद्देशाने आणि आपल्या चिरकाल स्मृती, आठवण, सौहार्दपूर्ण जिव्हाळा जोपासण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात एकतरी झाड लावावे असे, आवाहन सातारा जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीने केले आहे.
पिंपोडे बुद्रुक : निसर्ग संवर्धनाच्या उद्देशाने आणि आपल्या चिरकाल स्मृती, आठवण, सौहार्दपूर्ण जिव्हाळा जोपासण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात एकतरी झाड लावावे असे, आवाहन सातारा जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीने केले आहे.
घराच्या परिसरात किंवा शेताच्या बांधावर, अगर आपणास सोईस्कर असणार्या ठिकाणी चिरकाल टिकणारे एक झाड त्यामध्ये आंबा, फणस, चिक्कू, नारळ, आवळा, जांभूळ व इतर फळांची किंवा आपल्या आवडीचे एक झाड ऑगस्टअखेर या मांगल्यमय वातावरणात लागवड करून त्याचे संगोपन व रक्षण, संवर्धन करावे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना स्वतः झाड लावता येत नसेल त्यांनी आपल्या मुलाच्या व नातवाच्या मदतीने लावावे.
ज्येष्ठ नागरिक म्हणजे जीवनाचा उत्तरार्ध. पिकले पान कधीही गळून पडेल, हे सांगता येत नाही. परंतु, आपण एक झाड लावून ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ या लावणीतील बोलाप्रमाणे जरी आपले पान पिकले असले तरी त्याचा देठ हिरवा राहण्यासाठी, कुटुंबामध्ये वात्सल्याची हिरवाई निर्माण होण्याकरिता व स्मृती चिरकाल टिकून राहण्यासाठी एक झाड लावा. कारण, प्रत्येक झाड मानवाला ऑक्सिजन, फळ, फूल, सावली, सुगंध, हिरवाई सर्व काही देते. त्याकरिता झाड लावा, संवर्धन करा आणि पर्यावरणाला साथ द्या, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
झाडांची नोंद ठेवण्याचे आवाहन
झाडांची नोंद ठेवण्यासाठी ज्येष्ठांनी लावलेल्या झाडांचा प्रकार, लागण तारीख, आपले संपूर्ण नाव, पत्ता, भ्रमणध्वनी सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष संपतराव भोसले (रा. किन्हई, ता. कोरेगाव) या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले.