येथील जुना मोटार स्टँड परिसरात नगरपंचायतीने उभारलेले सार्वजनिक स्वच्छतागृह खुले करण्याच्या मागणीसाठी ‘सोनेरी ग्रुप’ने अभिनव पद्धतीने भीक मांगो आंदोलन छेडले. हलगीच्या निनादात बाजारपेठेत त्यांनी भीक गोळा केली. या आंदोलनाची दिवसभर शहरात चर्चा होती.
कोरेगाव : येथील जुना मोटार स्टँड परिसरात नगरपंचायतीने उभारलेले सार्वजनिक स्वच्छतागृह खुले करण्याच्या मागणीसाठी ‘सोनेरी ग्रुप’ने अभिनव पद्धतीने भीक मांगो आंदोलन छेडले. हलगीच्या निनादात बाजारपेठेत त्यांनी भीक गोळा केली. या आंदोलनाची दिवसभर शहरात चर्चा होती.
जुना मोटार स्टँड परिसरात हे एकमेव स्वच्छतागृह असून, ते सुरू करण्यासाठी ‘सोनेरी ग्रुप’ने गेल्या काही महिन्यांपासून विविध आंदोलनांद्वारे नगरपंचायतीला इशारा दिला होता. काही दिवसांपूर्वी धरणे आंदोलन केले असता, नगरपंचायतीच्या पदाधिकार्यांनी लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची ग्वाही दिली होती, प्रत्यक्षात मात्र हे स्वच्छतागृह खुले करण्यात आले नव्हते. त्यासाठी वेगवेगळी कारणे दिली जात होती.
नगरपंचायतीच्या भूमिकेला कंटाळून ‘सोनेरी ग्रुप’चे संस्थापक-अध्यक्ष संतोष नलावडे, नगरविकास कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज बर्गे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजित बर्गे, अनिल बाबर, राजेश दायमा, विजय ओसवाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी भीक मांगो आंदोलनास नगरपंचायत कार्यालयासमोर सुरुवात केली. या आंदोलनातून जमा होणारी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला दिली जाणार आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी सदर स्वच्छतागृह सुरू करण्याच्या उद्देशाने राज्याच्या स्वच्छता अभियानाच्या मुंबई येथील कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून खर्चास मान्यता मिळाल्यानंतर सदरील स्वच्छतागृह सुरू केले जाईल, असे त्यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.