गांजाची वाहतुकप्रकरणी दोघेजण ताब्यात
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 26 ः येथील बुधवार पेठ परिसरात दुचाकीवरून गांजाची वाहतुक करणाऱ्या दोघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दीड किलो गांजा व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. गणेश संजय वायदंडे व संदीप संपत बडेकर उर्फ बारक्या बडेकर दोघेही (रा. बुधवार पेठ, कराड) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी वर्षा अखेरीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्कारांचे विरोधात कारवाई करण्याबाबत आदेश दिला होता. त्यानुसार डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर करीत कराड शहर परिसरात अंमली पदार्थाविरोधात मोहीम राबविण्याच्या सूचना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने रविवारी रात्री मंडई परिसरात अचानकपणे कोबींग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घराची झाडाझडती घेतली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश वायदंडे व संदीप बडेकर हे यामाहा आरएक्स 100 गाडीवरून बेकायदेशीर गांजाची वाहतुक करताना मिळून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे तीस हजार रूपये किमतचा दीड किलो गांजा व लाख रूपये किमतीची दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, प्रविण जाधव, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशि काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांनी केली. चौघांवर डंक ॲण्ड ड्राईव्हप्रकरणी कारवाई डीवायएसपी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी मंडई परिसरात नाकाबंदी व कोबींग ऑपरेशन राबवून संयुक्त कारवाईत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चौघांवर कारवाई करत इतर मोटर वाहन कायद्याखाली एकूण 40 कारवाई करून त्यांच्याकडून 20 हजार 200 रूपये दंड वसूल केला.