कुमठे : कोरेगाव शहराची कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींवरून नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी गुरुवारी शहरातील दोन चिकन सेंटर्ससह एका देशी दारू दुकानावर कारवाई केली. प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारत पाच दिवसांसाठी ही दुकाने सील केली आहेत.
राज्य शासनाने कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत, त्याचबरोबर लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सुरू करताना त्यासाठी नियमावली जारी केली आहे. सकाळी 7 ते 11 यावेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असताना देखील शहरातील असिफ चिकन सेंटर, ताज चिकन सेंटरसह आझाद चौक परिसरातील एका देशी दारू दुकानावर परवानगी नसताना दुकान सुरू ठेवल्याबद्दल मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी कारवाई केली. याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या, अशी माहिती घाडगे यांनी दिली.
राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास नगरपंचायत प्रशासन अधिक गतीने कारवाई करणार आहे, याची व्यावसायिक व दुकानदारांनी नोंद घ्यावी, असा इशारा घाडगे यांनी दिला आहे.