हिवरे येथील मुलाच्या खुनप्रकरणातील आरोपी ४८ तासांत जेरबंद
News By : Muktagiri Web Team
आसनगाव: दि. २३ रोजी मौजे हिवरे ता.कोरेगाव जि.सातारा गावच्या हद्दीत कुंभारकी नावचे शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ वय १२ या शाळकरी अल्पवयीन मुलाचा कोणीतरी अज्ञात इसमाने गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. सदरची घटना ही अत्यंत संवेदनशील व गंभीर असल्याने पोलिस अधीक्षक सातारा समीर शेख व अप्पर पोलिस अधीक्षक सातारा ऑंचल दलाल यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शेळके , पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा अरूण देवकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना सूचना दिलेल्या होत्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पथक व वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि शिवाजी भोसले यांचेही एक पथक तयार करण्यात आले होते व गुन्हातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश देण्यात आले होते. सदरच्या पथकाकडून मयत मुलाच्या खुनासंदर्भात माहिती घेण्याचे काम चालू होते सर्व शक्यतांचा अभ्यास करून खुन कोणी केला असेल याबाबत माहिती घेतली जात होती पोलिस अधीक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरू होती.मयत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरून व तेथील जवळपासचे साक्षीदार यांचेकडे केलेल्या विचारपूस व चौकशीवरून सदरचा गुन्हा हा त्याचे वडिलांनी केला असल्याबाबतचा संशय निर्माण झाला होता.त्याप्रमाणे मुलाचा वडिलांनी दिलेली माहिती व इतर साक्षीदारांने दिलेली माहिती यामध्ये तफावत दिसून येत होती.पोलिसांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार व मुलाचे वडिल यांनी दिलेल्या माहितीवरून सदरचा खून हा त्याचे वडिलांनीच केला असल्याचा संशय अधिक बळकट झालेला होता.त्यानुसार त्याचे वडिलांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा खून हा त्यानेच केला असल्याची कबूली दिली आहे..सदरच्या खूनाचे कारण विचारले असता आरोपीने त्याला कॅन्सर असल्याचा संशय होता व त्याचे मृत्यू पश्चात आपल्या मुलाचे कसे होईल त्याचा संभाळ कोण करील त्यालाही कॅन्सर होईल त्याचे हाल होतील या विवंचनेतून त्याचा रस्सीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे.