‘गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला, याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला. त्याचा फटका सहकार क्षेत्रालाही बसला. पतसंस्थांची वसुली करताना अनंत अडचणी आल्या, अशाही परिस्थितीत सद्गुरू पतसंस्थेने पारदर्शी व काटकसरीने काम करीत उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रयत्न करून सभासदांना आठ टक्के लाभांश देत आहे ही खरोखरंच आजच्या परिस्थितीत कौतुकाची बाब ठरेल,’ असे प्रतिपादन सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले.
फलटण/कोळकी : ‘गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला, याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला. त्याचा फटका सहकार क्षेत्रालाही बसला. पतसंस्थांची वसुली करताना अनंत अडचणी आल्या, अशाही परिस्थितीत सद्गुरू पतसंस्थेने पारदर्शी व काटकसरीने काम करीत उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रयत्न करून सभासदांना आठ टक्के लाभांश देत आहे ही खरोखरंच आजच्या परिस्थितीत कौतुकाची बाब ठरेल,’ असे प्रतिपादन सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले.
श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण या संस्थेच्या 32व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
यावेळी चेअरमन तेजसिंह भोसले, व्हा. चेअरमन राजाराम फणसे, तुषार गांधी, अॅड. मधुबाला भोसले, अभिषेक फणसे, विक्रांत कदम, सुभाष आढाव व इतर संचालक उपस्थित होते.
भोसले म्हणाले, ‘2020-21 हे वर्ष सुद्धा फार अडचणीचे ठरत आहे. काटकसर, प्रामाणिकपणा जपत संस्थेच्या वाढीसाठी आपण प्रयत्नशील आहोत. शाखांचे कामकाज चांगल्या पद्धतीने व उद्दिष्टांची पूर्तता व्हावी यासाठी शाखांना आपण प्रोत्साहनपर बक्षिसेही देत आहोत. बहुतांश प्रमाणात प्रॉपर्टी ही पुरुषांच्या नावावर असल्याने महिला पतसंस्था अशा परिस्थितीत चालविणे अडचणीचे ठरत आहे. यामुळे फलटण शहरातील महिलांसाठी कार्यरत असणारी नामांकित स्वयंसिद्धा पतसंस्था ही आपण सद्गुरू पतसंस्थेत विलीन करण्याचा निर्णय घेत आहोत, ज्यामुळे सभासदांचे हित निश्चितच जोपासले जाईल.’
प्रास्ताविक व स्वागतामध्ये चेअरमन तेजसिंह भोसले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. अनंत अडचणी असूनही संस्थेने नावलौकिक कायम ठेवला आहे. संस्थेकडे 50 कोटी 34 लाख ठेव असून 37 कोटी 66 लाख रु. कर्जवाटप झालेली आहे. संस्थेस आर्थिक वर्षात 52 लाख 73 हजार रुपये नफा झाला असून, सभासदांना 8 टक्के लाभांश दिला जाणार आहे.
प्रारंभी प्रतिमा पूजन आणि श्रद्धांजली अर्पण केल्यावर सभेच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थेचे सरव्यवस्थापक संदीप जगताप यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
या सभेसाठी ठेवीदार, कर्जदार, सभासद उपस्थित होते. सोशल डिस्टन्िंसग व कोरोना संबंधीच्या नियमास अधीन राहून सभा संपन्न झाली.
संचालक अभिषेक फणसे यांनी आभार मानले.