कोळकी, ता. फलटण येथील बसस्थानक परिसरात चोरी केलेला मुद्देमाल विकण्यास आलेल्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दागिने व डीव्हिडी प्लेअरसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सातारा : कोळकी, ता. फलटण येथील बसस्थानक परिसरात चोरी केलेला मुद्देमाल विकण्यास आलेल्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दागिने व डीव्हिडी प्लेअरसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत माहिती अशी, दि. 21 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला फलटण शहरात चोरीचे सोन्याचे दागिणे विक्री करण्याकरीता सराईत चोरटा येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर एलसीबीचे पोनि सर्जेराव पाटील यांनी सहायक फौजदार आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करुन फलटण येथे रवाना केले.
सहायक फौजदार आनंदसिंग साबळे व पथकाने फलटण येथे जावून कोळकी बस स्थानक परिसरामध्ये सापळा लावला. यावेळी एकजण संशयीतरित्या मोटार सायकलवरुन शिंगणापूर ते फलटण रस्त्यावर येताना येताना दिसला. तो पोलीस अभिलेखावरील आरोपी असल्याने संशय आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे 6 तोळे सोन्याचे दागिणे व डि. व्ही. डी प्लेयर मिळून आले.
सोन्याच्या दागिण्याबाबत सखोल चौकशी केली असता ते दागिणे त्याने व त्याच्या साथिदारांनी सुमारे 10 ते 12 महिन्यांपुर्वी म्हसोबाची वाडी ता. इंदापूर, जि. पुणे येथे मोटार सायकलवर चाललेल्या महिलेच्या गळ्यातून जबरीने ओढून चोरी केल्याची सांगितले. तसेच आणखी चौकशी केली असता त्याने साथिदारांसह 5 ते 6 वर्षापुर्वी सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर, सस्तेवाडी, ता. फलटण येथून डिव्हीडी प्लेअर चोरी केल्याचे सांगितले.
त्याने सांगितलेल्या माहितीची पोलिसांनी पडताळणी केली असता फलटण शहर पोलीस ठाणे व भिगवण पोलीस ठाण्यात त्यासंदर्भात गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. याप्रकरणी एलसीबीने संशयीतांकडून दोन्ही गुन्ह्यातील एकूण 3 लाख 50 हजार 100 रुपयांचे सोन्याचे दागिणे व डि.व्ही.डी.प्लेयर हस्तगत केले आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनेप्रमाणे एलसीबीचेे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदसिंग साबळे, स. फौ. उत्तम दबडे, पो. हवा. तानाजी माने, राम गुरव, संतोष पवार, विजय कांबळे, पो. ना. रवी वाघमारे, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, म. पो. ना. मोना निकम, चा. पो. ना. संजय जाधव, विजय सावंत यांनी केली.