'कृष्णा'ने कोरोनाकाळात केलेली कामगिरी कौतुकास्पद
News By : कराड | संदीप चेणगे
कराड : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कृष्णा अभिमत विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाग्रस्त रुग्णांची आपल्या परिवाराप्रमाणे काळजी घेतली. आजपर्यंत सुमारे ८००० हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढले. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सुशासन दिवस कार्यक्रमासाठी कराड दौऱ्यावर आलेल्या ना.डॉ. पवार यांनी आज कृष्णा अभिमत विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे दुपारी २.३० च्या सुमारास कृष्णा अभिमत विद्यापीठात आगमन झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर डॉ. पवार यांनी कृष्णा कॅम्पसमधील कृष्णा अभिमत विद्यापीठ, कृष्णा मेडिकल कॉलेज, कृष्णा आर्थिक परिवाराचे नवे कार्यालय, तसेच विद्यापीठाच्या सुसज्ज ग्रंथालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचे पती प्रवीण पवारही सोबत होते. यावेळी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, कृष्णा अभिमत विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाकाळात खूप चांगले काम केले. फक्त कोरोनाग्रस्त रुग्णांचीच नाही तर या रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचीही तितकीच काळजी घेतली. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कृष्णा हॉस्पिटलमधील कॅन्सर विभाग अद्ययावत असून, मुंबईनंतर सर्वप्रकारच्या अद्ययावत सेवा इथं उपलब्ध आहेत. याशिवाय इतर विभागही अद्ययावत असून, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे इस्पितळ एक वरदान ठरले आहे. यावेळी डॉ. पवार यांचे सहाय्यक डॉ. ओमप्रकाश शेटे, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डाॅ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर आदी उपस्थित होते.