पळशी (ता. खटाव) येथील सुपुत्र व वांझोळी शाळेतील उपक्रमशील शिक्षक शंकर विठ्ठल देशमाने यांना खटाव पंचायत समितीचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाला आहे.
वडूज : पळशी (ता. खटाव) येथील सुपुत्र व वांझोळी शाळेतील उपक्रमशील शिक्षक शंकर विठ्ठल देशमाने यांना खटाव पंचायत समितीचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाला आहे.
माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय काबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, पं. स. सभापती जयश्री कदम-पाटील, उपसभापती हिराचंद पवार आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देशमाने यांनी त्यांच्या सेवाकाळात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, आर्थिक दुर्बल कुटुंबांना घरकुल बांधणीसाठी सहकार्य, जीवनविद्या मिशनची प्रवचन सेवा, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धेवर जनजागृती, लिंगायत तेली समाज संघटनेच्या माध्यमातून व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे, ज्येष्ठ नागरिक सत्कार, महिलांसाठी उद्योग व्यवसाय शिबिर आदी उपक्रम राबविले आहेत. जिल्ह्यातील विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे त्यांनी उत्तमप्रकारे सूत्रसंचालन केले आहे. याशिवाय शासनाच्या वेगवेगळ्या अभियानात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
यापूर्वी त्यांना माण तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श ग्रामशिक्षक पुरस्कार, इंचगिरी वारकरी संप्रदायाचा सेवासूर्य पुरस्कार, पश्चिम महाराष्ट्र लिंगायत तेली समाजाचा समाजभूषण पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत.
या पुरस्काराबद्दल त्यांचे तैलिक महासंघाचे अध्यक्ष खा. रामदास तडस, जि. प. सदस्य सुरेंद्रदादा गुदगे तसेच जि. प., पंचायत समितीचे मान्यवर पदाधिकारी व शिक्षण विभागातील अधिकार्यांनी अभिनंदन केले.